शिवसेना सोडल्याने कोणी संपत नसतो, उलट भरारी घेतो, राणे, नाईक, भुजबळ उत्तम उदाहरण

नारायण राणेंसोबत बाहेर पडलेले अमरावतीमधील दर्यापूरचे आमदार प्रकाश भारसाखळे हे पोटनिवडणुकीत विजयी होऊन पुन्हा आमदार झाले होते. नारायण राणेंसोबत बाहेर पडलेले कालिदास कोळंबकर वडाळ्यातून आजही विद्यमान आमदार आहेत.

मुंबईः एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. शिंदे गटाच्या मागे शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार उभे राहिल्यानं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एक दोन पळून गेले म्हणून काय शिवसेना संपत नाही, तसेच ज्यांनी बंडखोरी केलीय, त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, असं ओपन चॅलेंजच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी दिलं होतं. त्याला एकनाथ शिंदेंनीही विधिमंडळातून चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

जे आमदार माझ्याबरोबर आहेत. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेत आहे. ते जर निवडून नाही आले, तर मी गावाला शेती करायला निघून जाईन, अशी भीष्मप्रतिज्ञा शिंदे यांनी घेतलीय. त्यामुळे शिवसेना सोडल्यानं बंडखोरांचं नक्की काय होणार याचीच सगळीकडे चर्चा आहे. पण इतिहास सांगतो की, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेतून बंडखोरी केलीय, ते पुढे जाऊन आमदार, मंत्री झालेत.

शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले कायमच निवडणुकीत पडतात हे समीकरण २००५ साली नारायणराव राणेंनी खोडून काढत मालवण पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून दाखविलं. सद्यस्थितीत नारायण राणे हे केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत, तर त्यांचे सुपुत्र नितेश राणे सलग दुसरी टर्म महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहेत. तर सिंधुदुर्गातील सगळी सत्तास्थाने जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्हा कृषी समिती आदी राणेंच्या ताब्यात आहेत.

नारायण राणेंसोबत त्यावेळी जे विद्यमान आमदार सेनेतून बाहेर पडले, त्यातील १३ पैकी १२ आमदार परत निवडून आले, फक्त शाम सावंत हे श्रीवर्धनमधून पोटनिवडणूकीत पराभूत झाले. सुभाष बने (संगमेश्वर लांजा), गणपत कदम (राजापूर), शंकर कांबळी (वेंगुर्ला) हे नारायण राणेंसोबत गेलेले कोकणातील आमदार त्यावेळी शिवसेनेचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत दणदणीत मतांनी विजयी झाले होते. विशेष म्हणजे नारायण राणेंसोबत बाहेर पडलेले अमरावतीमधील दर्यापूरचे आमदार प्रकाश भारसाखळे हे पोटनिवडणुकीत विजयी होऊन पुन्हा आमदार झाले होते. नारायण राणेंसोबत बाहेर पडलेले कालिदास कोळंबकर वडाळ्यातून आजही विद्यमान आमदार आहेत.

नारायण राणेंसोबत बाहेर पडलेले विजय वडेट्टीवारसुद्धा आजही चिमूरमधून विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसतर्फे जून २०१९ मध्ये त्यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं, तर मविआ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं होतं. राणे समर्थक म्हणून सेनेतून बाहेर पडलेले सिन्नरचे माणिकराव कोकाटे हे आजही महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहेत. तर विनायक निम्हण हे सेनेतून बाहेर पडल्यावर २००९ साली काँग्रेसमधून पुन्हा आमदार झाले. पुढे २०१४ ला भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला खरा पण सेना सोडल्यावर लढविलेल्या पहिल्याच निवडणुकीत मात्र ते विजयी झाले होते. नारायण राणेंसोबत शिवसेना सोडणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे आताही भाजप सहयोगी आमदार आहेत.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी सेना सोडल्यावर एक अपवाद वगळता कायम निवडून आलेत, आजही त्यांच्या घरात २ आमदार आहेत आणि ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. नवी मुंबईतील ताकदवान नेते गणेश नाईक यांनीसुद्धा शिवसेनेला आव्हान देत शिवसेना सोडली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर आपली मजबूत पकड ठेवून आहेत. स्वतः तेही आमदार आहेत. तरीसुद्धा सारखं सारखं सेना सोडून बाहेर गेलेल्यांची काय अवस्था होते हे जे सांगितलं जात आहे, ते काही पटण्यासारखं नाही. राज ठाकरेंनीही 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तसेच विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आणलेत.

शिवसेना सोडून बाहेर पडलेले प्रत्येक जण आज कुठे ना कुठे आहेत हे आजघडीला स्वतः एकनाथ शिंदेसुद्धा चांगलेच जाणतात. ज्यांना वाटतं की शिंदेगटात आज जे आमदार आहेत त्यांचं करिअर आता संपेल वगैरे, तर असं काही होणार नाही. कोणताही नेता असा सहजासहजी कधीही अजिबात संपत नसतो. तुमच्या मतदारसंघातील जनता, कार्यकर्ते तुमच्यासोबत असतील तर काही फरक पडत नसतो. फक्त एखादा पक्ष सोडल्यानंतर काही काळ त्याला अडचणीचा सामना करावा लागतो, परंतु तो नंतर पुन्हा एकदा ताकदीनं उभा राहतो हे अनेकदा पाहायला मिळालंय.


हेही वाचाः संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी