घरमहाराष्ट्रLegislative session : निवडणूक निकालाने विरोधक गलितगात्र, मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

Legislative session : निवडणूक निकालाने विरोधक गलितगात्र, मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

Subscribe

नागपूर : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भाजपाला यश मिळाले. त्यामुळे विरोधी पक्षाचे अवसान गळाले असून त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होते, त्यांचा करिष्मा संपला असे म्हणत होते, त्यांना या देशातील जनतेने दाखवून दिले आहे. जनता जनार्दनाने मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची हमी जनतेने देऊन टाकली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

हेही वाचा – आम्ही दिल्लीत गेल्यावर ‘कठपुतली’ म्हणणाऱ्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही…; एकनाथ शिंदे कडाडले

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण दिले होते. मात्र, विरोधी पक्षाने सरकारवर टीका करत चहापानावर बहिष्कार घातला. हा बहिष्कार टाकताना विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. या पत्रात विरोधी पक्षाने सरकारवर अनेक आरोप केले आहेत. या आरोपांचा आणि विरोधकांच्या टीकेचा शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला.

गेल्या अडीच वर्षांत मागील सरकारला त्यांच्या अहंकारामुळे केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत. आपल्या अहंकारामुळे त्यांनी राज्याचे नुकसान केले. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जे प्रकल्प सुरू झाले होते, ते त्यांनी बंद केले. अनेक प्रकल्प स्थगित केले. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही मेट्रोपासून समृद्धीपर्यंत अनेक प्रकल्प पुढे नेले, असे शिंदे म्हणाले. जलयुक्त शिवारची चौकशी केली. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रकल्प होता तो आम्ही सुरू केला, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : विरोधी पक्षाने झोपेत पत्र लिहिलं का? विदर्भ, मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेख नाही

कायदा आणि सुव्यवस्था तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षाला शिंदे यांनी शायरीतून उत्तर दिले. ‘मुंह खोलने से पहले सोचना सीख ले, पहले तो अपने अंदर झाँक के देख ले!’ तुम्ही लोक आधी तुमचे बघा आणि मग सरकारवर टीका करा, असे त्यांनी सुनावले. विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते पाहता कुणी कशामध्ये भ्रष्टाचार केला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. खिचडीमध्ये, बॉडीबॅगमध्ये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामध्ये, कोविडमध्ये माणसे मरत असताना काही लोक पैसे बनवत होते. हे पाप तुम्ही कुठे फेडणार? ज्याच्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले ते सर्व बाहेर येईलच. दूध का दूध, पानी का पानी होईलच. यामध्ये आम्ही कुठल्याही सूड भावनेने निर्णय घेणार नाही. पण जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर आणण्याचा काम आमचा गृह विभाग करेल, असे शिंदे यांनी बजावले.

आम्ही कधी खोटे गुन्हा दाखल केले नाहीत. जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही मांडली आणि त्याची नोंद झाली. जसे अडीच वर्षांच्या काळात कोणाकोणावर खोटे गुन्हे दाखल झाले, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आमचे सरकार गुन्हे लपवून कातडी वाचवणारे सरकार नाही तर, सत्याला सामोरे जाणारे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – Ajit Pawar VS Vijay Wadettiwar सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत; वडेट्टीवारांच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले…

अंतिम आठवडा प्रस्ताव, अशा शब्दांत त्यांनी विरोधी पक्षाने दिलेल्या पत्राची खिल्ली उडवली. त्यानंतर राज्य सरकारच्या गेल्या दीड वर्षातील कामाची माहिती दिली. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही प्रकल्प आणि ज्या काही योजना आहेत, त्या कालबद्ध वेळेत पूर्ण केले जातील. गेल्या दीड वर्षात आम्ही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि सरकारच्या लोकप्रियतामुळे विरोधकांना देखील धडकी भरली आहे. त्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आरोप केले आहेत, असे शिंदे म्हणाले.

विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची नमो सन्मान शेतकरी योजना आपण लागू केली आहे. अशी योजना आणणारे आपले महाराष्ट्र पहिले राज्य आहे. त्याचबरोबर जे महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी आम्ही केली. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जे कधी घरातून बाहेर पडले नाहीत, ते शेताच्या बांधावर जाण्याची भाषा करत आहेत. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत, आम्ही सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जातो. शेतकऱ्यांना मदत करताना आम्ही हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी हा आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे. आम्ही त्याच्या तोंडाला पाने पुसणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – Pawar vs Pawar : राज्यात ‘पान-सुपारी सरकार’; रोहित पवार यांचा पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -