कल्याणमध्ये बिबट्याचा थरार, परिसरात उडाली खळबळ

मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील काही भागांत बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मुंबईनंतर आता कल्याणमध्ये बिबट्याचा आज पुन्हा एकदा थरार पाहायला मिळाला. कल्याणमधील चिंचपाडा रोडवरील एका इमारतीत बिबट्या अडकल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या भीतीनं लोक जीवाच्या आकांतानं घराबाहेर पळाले. त्यानंतर आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत आणि बचावकार्यास सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या श्रीराम अनुग्रह टॉवर या इमारतीच्या थेट दुसऱ्या मजल्यावर घुसला. त्यानंतर बिबट्या तिथंच अडकून पडला. बिबट्या अडकल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांसह वनविभागाचे अधिकारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आरे कॉलनीत बिबट्या घुसल्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. यामधील एका घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा : राज्याचे राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर; महाराष्ट्रातून उचलबांगडी होणार का