घरमहाराष्ट्रहुश्श! दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद

हुश्श! दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद

Subscribe

घोडेगाव ( ता. आंबेगाव ) मध्ये बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

‘बिबट्या आला रे’ची बोंब, मानवी वस्तीत बिबट्याचा वाढता वावर. त्यातच दोन पाळीव कुत्र्यांना फस्त केल्याने घोडेगावच्या ( ता. आंबेगाव ) लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. बी. डी. काळे कॉलेजपासून जवळच असलेल्या पसारेवस्तीच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने लोकं घाबरली होती. अखेर वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यास यश आले आहे. त्यामुळे बिबट्या आला रे! याची भीती आता लोकांना राहणार नाही. मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने दोन दिवसांपासून पिंजरा लावला होता. अखेर मंगळवारी पहाटे ५.३० वाजता बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.

नागरिकांमध्ये भीती

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिकांच्या मागणीमुळे वनविभागाने शांताराम काळे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. जवळपास ४८ तासानंतर बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पिंजरा लावलेल्या ठिकाणापासून केवळ हाकेच्या अंतरावर इनामवस्ती, काळेवाडी -दरेकरवाडी , पानसरेवस्ती, सालगाव , घुलेवाडी, धोंडमाळ, शिंदेवाडी असा मानवी वस्तीचा भाग आहे. दरम्यान, बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह या केंद्रात पाठवण्यात येणार आहे. एका बिबट्याला पकडल्यानंतर देखील आणखी बिबट्यांचा वावर या भागात असण्याची शक्यता आहे. डोंगराळ भाग आणि उसाचे क्षेत्र असल्याने आणखी बिबट्यांच्या वावराची शक्यता बळावते. परिणामी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -