बँक कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश का नाही? संघटनेचा सरकारला सवाल!

बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बँक संघटनांकडून होत आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील लोकल अडीच महिन्यानंतर सुरू झाली. या लोकलमध्ये पालिका, पोलिस, बेस्ट अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी अत्यावश्यक सेवेत असलेल्या बँक, पोस्ट, प्रसारमाध्यम आदी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना मात्र सोमवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेचा प्रवास नाकारण्यात आला. त्यामुळे आता बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बँक संघटनांकडून होत आहे.

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघाने राज्य सरकारला पत्र लिहून लोकलसाठी परवानगी मागितली आहे.‘बँक कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवासाची परवानगी द्यावी, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येईल. तसेच यामुळे पूर्ण क्षमतेने बँक सेवा सुरू ठेवता येईल’ अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या विषयी बोलताना युनियन फोरम ऑफ बँक युनियनचे (UFBU)महाराष्ट्र संयोजक देवीदास तुजापूरकर म्हणाले की, रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. पण अत्यावश्यक सेवांच्या यादीत समावेश नसल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास नाकारण्यात आला. लॉकडाउनदरम्यान बँकांनी अखंडित सेवा देण्याची अपेक्षा सरकारकडून केली जाते. पण लोकल सेवा वापरताना बँक कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या यादीत विचार होत नाही.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचता यावे याकरीता सोमवारपासून लोकलसेवा सुरू झाली. सुमारे अडीच महिन्यानंतर सुरू झालेल्या लोकलमधून पहिल्या दिवाशी ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला.


हे ही वाचा – राज्यात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन? वाचा काय आहे अहवाल!