घरमहाराष्ट्रसत्तांतराचं स्वप्न संजय राऊतांना पाहू द्यात; शिंदे-भाजप सरकार भक्कम, एकनाथ शिंदेंचा पलटवार

सत्तांतराचं स्वप्न संजय राऊतांना पाहू द्यात; शिंदे-भाजप सरकार भक्कम, एकनाथ शिंदेंचा पलटवार

Subscribe

मी शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे आशीर्वाद नक्कीच घेणार आहे. मला राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय

मुंबईः सत्तांतराचं स्वप्न संजय राऊतांना पाहू द्यात. ते स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्न पाहू द्यात. राज्यात 166 लोकांचं सरकार आहे. केंद्रातील सुद्धा लोकसभेत 12 लोकांनी सभापतींना पत्र दिलंय. दोन्ही सदनात आमच्याकडे दोन तृतीयांश संख्याबळ आहे. पूर्णपणे मजबूत सरकार आहे. शिंदे-भाजप सरकार भक्कम आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना लगावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाकेंची भेट घेतलीय, त्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

लिलाधर डाकेंच्या प्रकृतीची विचारपूस करायला मी त्यांना भेटायला आलोय. सदिच्छा भेट द्यायला आलोय. लिलाधर डाकेंचं शिवसेना वाढवण्यासाठीच योगदान मी जवळून पाहिलेलं आहे. बाळासाहेबांबरोबर सुरुवातीचे जे नेते होते, त्यामध्ये डाकेसाहेबांनी काम केलंय. आनंद दिघेंचे आणि डाकेंचे स्नेहाचे संबंध होते, शिवसेना पूर्वी बाळासाहेबांबरोबर वाढवण्याचे काम डाकेंनी केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत डाके साहेबांनी शिवसेना वाढीचं काम केले. आज आपण जी वाढलेली शिवसेना पाहतोय, यात डाकेसाहेबांसारख्या नेत्यांचं फार मोठं योगदान आहे. मंत्रिपद मिळूनसुद्धा आज त्यांनी प्रामाणिकपणे काम केले, त्यांची अत्यंत साधी राहणी आहे, स्वतःचं काही त्यांनी तयार केलं नाही. जे केलं ते शिवसेनेच्या चार अक्षरांसाठी केले. म्हणून अशा सर्व नेते आणि कार्यकर्त्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेलेली आहे. डाकेंना एक कार्यकर्त्या म्हणून भेटायला आलेलो आहे. मी शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे आशीर्वाद नक्कीच घेणार आहे. मला राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.

- Advertisement -

तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरही त्यांनी भाष्य केलंय. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, परंतु जेव्हापासून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा कारभार हाती घेतला, तेव्हापासून आपण पाहताय की शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतले आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचं काम आम्ही थांबू दिलेलं नाही. जनतेच्या हिताचं आहे तिथे कुठेही बाधा येणार नाही, एवढं मी सांगू शकतो. सरकार स्थापनेनंतर शेतकरी, सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचंही ते म्हणालेत.


हेही वाचाः मुख्यमंत्री आपला मुक्काम दिल्लीत हलवतील असं वाटतंय, संजय राऊतांचा खोचक टोला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -