घरमहाराष्ट्रपरमबीर विरोधकांची 'डार्लिंग', पण सरकार बहुमताचं; कुरघोडी कराल तर आग लागेल

परमबीर विरोधकांची ‘डार्लिंग’, पण सरकार बहुमताचं; कुरघोडी कराल तर आग लागेल

Subscribe

सामनातून शिवसेनेचा इशारा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने राज्यात खळबळ उडाली आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन राज्यातील राजकारण चागलंच तापलं आहे. दरम्यान, आता शिवसेनेने परमबीरांच्या लेटर बॉम्बवरुन भाजपला इशारा दिला आहे. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्या बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, असा इशारा शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून भाजपला दिला आहे.

“माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो आरोपांचा धुरळा उडवला आहे, त्यामुळे गृहखात्याची प्रतिमा नक्कीच मलिन झाली आहे. हा सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे व विरोधी पक्षाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची मागणी कालपर्यंत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता. आज परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’ झाले आहेत व परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर निशाणा साधीत आहेत. महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे. एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये!” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

- Advertisement -

“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अगदी बेभरवशाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे भारतीय जनता पक्षाचे मत कालपर्यंत होते, पण त्याच परमबीर सिंग यांना आज भाजप डोक्यावर घेऊन नाचत आहे,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे. “परमबीर सिंग यांची राज्य सरकारने पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आहे. अॅण्टिलिया स्फोटके प्रकरणात फौजदार सचिन वाझे एनआयएच्या अटकेत आहेत. हे सर्व प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही व पोलीस खात्याचीच बदनामी झाली असे मानून सरकारने पोलीस आयुक्तांना हटवले. ”सचिन वाझे यांना हटवून काय फायदा? पोलीस आयुक्तांना हटवा” अशीच भाजपची मागणी होती. आता त्याच परमबीर सिंग यांना खांद्यावर घेऊन भाजपवाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान होऊन नाचत आहेत. हा राजकीय विरोधाभास आहे,” अशी टीका सेनेने केली आहे.

“परमबीर सिंग यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा उद्रेक समजू शकतो, मात्र शासनाच्या सेवेत अत्यंत वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीने असा सनसनाटी पत्रोपचार करणे नियमात बसते काय? गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहायचे व ते प्रसिद्धी माध्यमांना पोहोचवायचे हे शिस्तीत बसत नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. ” देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात व दोन दिवसांत परमबीर सिंग हे असे पत्र लिहून खळबळ माजवतात. त्या पत्राचा आधार घेऊन विरोधी पक्ष जो हंगामा करीत आहे हा एक कटाचाच भाग दिसतो,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

- Advertisement -

“विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी वापर महाराष्ट्रात चालवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यास हे परवडणारे नाही. एका बाजूला राज्यपाल राजभवनात बसून वेगळेच उपद्व्याप करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचा खेळ करीत आहे. कुठे एखाद्या भागात चार कोंबडय़ा व दोन कावळे विजेच्या तारांचा शॉक लागून मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय किंवा एनआयएला पाठवू शकेल असे एकंदरीत दिसते,” असा टोला सेनेने लगावला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -