कोल्हापूरकन्या ऐश्वर्या जाधवच्या मदतीसाठी जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

jayant patil

सावित्रीमाईंकडून प्रेरणा घेत त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत महाराष्ट्रातल्या लेकी आज उत्तुंग भरारी घेत आहेत. ऐश्वर्याही या यशाच्या मार्गावर वाटचाल करत असताना तिला राज्यसरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जागतिक पातळीवरील टेनिसपटू ज्या विम्बल्डन कोर्टवर चमकले त्याच कोर्टवर आपल्या कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातील यवलूज येथील अवघ्या बारा वर्षाच्या ऐश्वर्या जाधव हीने अत्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. जगातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस मैदानात अतिशय कडवी झुंज देत तमाम भारतीयांचे लक्ष वेधणाऱ्या ऐश्वर्या जाधवला आज आपल्या खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, असेही जयंत पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

ऐश्वर्याचे वडील दयानंद जाधव हे सर्व्हेअर म्हणून काम करतात. मुलीचे खेळात करिअर व्हावे म्हणून त्यांनी आपले गाव सोडून कोल्हापुरात भाड्याच्या घरात संसार सुरू केला. या खर्चिक खेळात आपल्या मुलीला पाठबळ देण्यासाठी पै पै जमवत खर्च केला.

दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय टेनिस असोसिएशनच्या वतीने आयटीएफ जागतिक १४ वर्षाखालील मुलींची टेनिस स्पर्धा झाली होती. या स्पर्धेतील भारतीय संघातून सहभागी झालेली ऐश्वर्या जाधवने चार सामने जिंकत उपांत्य फेरीत मजल मारली होती. त्यामुळे तिची विम्बडंनसाठी निवड झाली. तेथे ऐश्वर्याने अतिशय चमकदार खेळ करत उपस्थित टेनिसप्रेमींची मने जिंकली आहे असेही जयंत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.