घरमहाराष्ट्रकोकणात जनजीवन विस्कळीत

कोकणात जनजीवन विस्कळीत

Subscribe

कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर तसा कमी असला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पुराचे पाणी अद्याप ओसरले नाही. जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. सलग आठवडाभरापासून कोकणवासीय मुसळधार पावसाला सामोरे जावे लागत असल्याने जिल्ह्यात आता दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते खचले असल्याने सिंधुदुर्गातील अनेक रस्ते बंद झाले असून काही गावांशी संपर्क तुटला आहे.

सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे आंबाघाटातील रस्ता मधोमध खचला असून दोन दिवस वाहतूक बंद होती. जिल्ह्यात होणारा दुधाचा आणि भाज्यांचा तुटवडा पाहून गुरुवारी घाटातून एकेरी वाहतूक सुरु केली. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड आणि चिपळूण याठिकाणच्या जगबुडी आणि वाशिष्टी या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाली असून तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर महामार्गावरील संगमेश्वर बावनदी आणि आरवली येथील गडनदी या नद्यांचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. दरम्यान चिपळूण, खेड या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरी राजापूर, लांजा याठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. राजापूरच्या काही सखल भागात अजूनही पुराचे पाणी असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisement -

मुंबई-गोवा सागरी महामार्ग बंद
मुसळधार पावसामुळे उद्धवलेल्या पूरस्थितीमुळे केळुस गावात पाणी आहे. त्यामुळे मुंबई-गोवा सागरी महामार्गावरील वाहतूक चौथ्या दिवशीही बंद आहे. तर भनसाळ नदीच्या पुराचे पाणी ओसरल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

अनेक रस्ते बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील पाडगाव आणि कुडाळमधील निळेली धरणाचे दरवाजे उघडल्याने कुडाळ तालुक्यातील आंबेरी फुलावर पाणी आले. कुडाळमधील कर्ली नदीची पूरस्थिती कायम आहे. तर तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने बांदा, दोडामार्ग रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच मनेरी गावात पूलावरुन पाणी जात असल्याने तो रस्ताही बंद केला आहे.याशिवाय कुडाळ तालुक्यातील माणगावमधील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलावरुन गेल्या चार दिवसापासून पाणी जात असल्याने 27 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. बांदा, खारेपाटण, माणगाव बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -