‘या’ शहरात वाईन शॉप बंदच; तळीरामांची निराशा

लांबच्या लांब रांगा लावून देखील दुकाने काही शहरात उघडली नाही. त्यामुळे तळीरामांची मोठी निराशा झाली आहे.

liquor lover is very disappointed as the wine shop in pimpri chinchwad is closed
'या' शहरात वाईन शॉप बंदच; तळीरामांची निराशा

राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीला मंजूरी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेर ही मोठी रांग लावण्यास तळीरामांनी सुरूवात केली. शासनाने दारू दुकाने उघडण्यासाठी दिलेल्या परवानगीला २४ तासही उलटले नसताना सकाळपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये तळीरामांनी दारूच्या दुकानांबाहेर प्रतिक्षा करण्यास सुरूवात केली. मात्र, लांबच्या लांब रांगा लावून देखील दुकाने काही शहरात उघडली नाही. त्यामुळे तळीरामांची मोठी निराशा झाली आहे.

या शहरात वाईन शॉप बंद

पिंपरी – चिंचवड शहरात वाईन शॉप आणि मद्याची दुकाने बंद आहे. दरम्यान, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, रेड झोन परिसरातील वाईन शॉप आणि दारुच्या दुकानासंदर्भात संभ्रम अवस्था आहे. मात्र, जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क यांच्याकडून अद्याप कोणताच आदेश आला नसल्याने शहरातील वाईन शॉप आणि दारुची दुकाने बंद असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले आहे.

२१ परिसर कंटेंमेंट झोनमध्ये

पिंपरी – चिंचवड परिसरातील २१ परिसर कंटेंमेंट झोनमध्ये आहेत. त्यामुळे इथे वाईन शॉप आणि मद्याची दुकाने उघडणार की नाही? असा प्रश्न तळीरामांना पडला आहे. दरम्यान, आज वाईन शॉप आणि मद्याची दुकाने उघडणार या आशेने अनेक तळीरामांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. मात्र, याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी रांगा पांगवल्या.

याठिकाणी लागल्या होत्या लांबच लांब रांगा

पिंपळी – चिंचवड येथील पिंपळे गुरव, चिखली, पिंपळे सौदागर, आकुर्डी, निगडी, वाकड, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड या परिसरात तळीरामांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. परंतु, त्यांची निराशा झाल्याचे पाहायला मिळाले.


हेही वाचा – पीडीएफ स्वरूपातील वृत्तपत्रांची चोरी; कठोर कारवाईची मागणी