जळगाव : जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक रेल्वे रूळावर आला आणि मुंबई-अमरावती एक्स्प्रेसला धडकला. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
…अन् ट्रक इंजिनला धडकला
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्स्प्रेस ( क्र.12111 ) ही गाडी सकाळी चार ते पाचच्या दरम्यान बोदवड रेल्वे गेट जवळून जात होती. तेव्हा, बंद असलेले क्रॉसिंग रेल्वेगेट तोडून धान्याने भरलेला एक ट्रक रूळावर आला आणि इंजिनला जाऊन धडकला.
झोपलेले प्रवासी बर्थवरून खाली
एक्प्रेसची गती कमी असल्याने चालकाने ब्रेक लावून रेल्वे थांबवली. तर ट्रक इंजिनवर धडकताच ट्रक चालक उडी घेऊन पसार झाला. एक्स्प्रेस चालकाने तातडीने ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु, एक्स्प्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बर्थवरून खाली पडले.
ट्रक रूळावरून काढण्याचे काम सुरू
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या रेल्वे रूळावरून ट्रक काढण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. रेल्वेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांकडून इतरही सर्व तपासणी केली जाईल.
जखमींवर रूग्णालयात उपचार
या अपघातात कोणताही जिवितहानी झाली आहे. जखमी झालेल्यांवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : आधी वन विभागाने बुलडोझर फिरवला, मग होळी दिवशीच अज्ञातांनी खोक्याचे घर पेटवले, महिलांना मारहाण अन्…