घरदेश-विदेशदेशभरातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत-मोदी

देशभरातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत-मोदी

Subscribe

देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशातील अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनीही भारतातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत करोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच करोनाविरोधात भारताची करोनाशी लढाई मजबूत आहे. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण आपले कर्तव्य पार पाडत आहे. एवढंच नाहीतर प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या कर्तव्याचे पालन केले आहे. अनेकांना खूप त्रास सहन करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हीच खरी आदरांजली आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागांत विविध उत्सव होतात. अनेक राज्यांत लॉकडाऊनमध्येच नववर्षाचे स्वागत करण्यात आले. परंतु लोकांनी नियमांचे संयमाने पालन केले. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे,’ असे यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितले.

- Advertisement -

मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘करोनाचे वैश्विक संकट आहे त्यामध्ये कोणत्याही देशाशी तुलना करणे योग्य नाही. पण जर जगभरातील मोठ्या देशांतील करोनाचे आकडे पाहिले तर त्यांच्या तुलनेत भारत फार चांगल्या परिस्थितीत आहे. महिन्याभरापूर्वी अनेक देश करोनाच्या आकड्यांमध्ये भारतासोबत होते. पण आता त्या देशांमध्ये करोनाचा संसर्ग वाढल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने जर वेळीच कठोर निर्णय घेतले नसते तर आज भारताची परिस्थिती काय असती, याची कल्पनाही करवत नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा फार मोठा फायदा देशाला झाला आहे. आर्थिकरित्या पाहिले तर देशाला मोठी किमत चुकवावी लागली आहे; पण भारतीयांच्या तुलनेत ती किंमत काहीच नाही.’

‘जगभरातील करोनाच्या संसर्गााची स्थिती आपल्या सर्वांना माहितच आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने करोनाला रोखण्याचा कसा प्रयत्न केला याचे आपण साक्षीदार आहात. भारतातील करोनाबाधितांचा आकडा १०० होण्याआधीच भारताने विदेशी नागरिकांना १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. करोनाचे फक्त ५५० रूग्ण होते तेव्हाच भारताने २१ दिवसांचा लॉकडाऊन केला. भारताने करोनाचा संसर्ग वाढण्याची वाट नाही पाहिली. तात्काळ निर्णय घेऊन समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला.’ असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

’कमी स्त्रोत असताना भारताने, जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणे स्वभाविक आहे. देशातल्या राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत चांगले काम केले आहे. या सगळ्या प्रयत्नांनंतरही कोरोना ज्याप्रकारे जसा पसरतोय, त्याने सगळ्यांना सतर्क केले आहे. भारतात पण करोनाच्या विरोधात आता लढाई कशी करायची, विजयी कसे व्हायचे, नुकसान कमी कसे होईल, लोकांचे हाल कमी कसे होतील यावर राज्यांबरोबर चर्चा होत आहे. सगळेजण हाच पर्याय देतात की लॉकडाउन वाढवायला हवा. अनेक राज्यांनी लॉकडाऊन आधीच वाढवला आहे.’

‘…तर सूट दिली जाऊ शकते’
करोनाला कोणत्याही परिस्थितीत नवीन ठिकाणी वाढू द्यायचे नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला किंवा करोना रुग्णाचा मृत्यू झाला तर ही आपल्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला करोना हॉटस्पॉटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्कता ठेवायलाच हवी. त्या ठिकाणी रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नवे हॉटस्पॉट आपल्या परिश्रमांना आव्हान देऊ शकतात, नवे संकट निर्माण करू शकतात. त्यामुळे पुढचा एक आठवडा करोनाविरुद्धच्या लढाईत कठोरता आणखी वाढवण्यात येईल. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक भाग, प्रत्येक स्टेशन, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्यांतील आकडेवारीचे बारकाईने मूल्यांकन केले जाईल. जे क्षेत्र या अग्निपरीक्षेत यशस्वी होतील, जिथे हॉटस्पॉटमध्ये वाढ होणार नाही तिथे काही सूट दिली जाऊ शकते. परंतु ही परवनागी सशर्त असेल. बाहेर पडण्याचे नियम अतिशय कडक असतील. लॉकडाऊनचे नियम तोडले गेले आणि करोनाचे रुग्ण आढळले तर सगळी शिथीलता परत घेतली जाईल. त्यामुळे आपण स्वत: बेजबाबदारपणा करता कामा नये आणि कुणाला करूही देता कामा नये, असेही पंतप्रधान म्हणाले.

मोदींचे तरुण शास्त्रज्ञांना आवाहन
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्येही वेगाने काम सुरु आहे. जानेवारी महिन्यात आपल्याकडे कोरोनाच्या तपासणीसाठी केवळ एकच प्रयोगशाळा होती, आता २२० पेक्षा जास्त प्रयोगशाळांमध्ये तपासणी काम सुरु आहे. भारतात आज आम्ही एक लाखांपेक्षा जास्त बेडची व्यवस्था केली आहे. एवढंच नाही तर ६०० पेक्षा जास्त अशी रुग्णालये आहेत, जी केवल कोविड-१९च्या उपचारांसाठी काम करत आहेत. या सुविधा आणखी वेगाने वाढवल्या जात आहेत. भारताकडे आज मर्यादित साधनसामुग्री आहे. परंतु माझे देशाच्या तरुण शास्त्रज्ञांना विशेष आवाहन आहे की, जगाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी पुढे या आणि करोनाची लस बनवण्याचा विडा उचला.

मोदींनी सांगितलेल्या सप्तपदी
१. जुने आजार असलेल्या वृद्धांची काळजी घ्या.
२. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग पाळा, प्रत्येकाने मास्क वापरा.
३. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुषच्या सूचना पाळा.
४. प्रत्येकाने आरोग्य सेतू app download करा.
५. एकातरी गरीब कुटुंबाची काळजी घ्या.
६. सध्याच्या काळात कोणालाही नोकरीवरून काढू नका.
७. करोनायोद्धे – डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचार्‍यांचा गौरव करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -