मुंबई : लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने प्रत्येक मतदान बुथवर 370 मते वाढविण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशसह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी मंगळवारी दिली. यासाठीचे बूथ विजय अभियान येत्या 3 एप्रिलपासून सुरु होणार असून हे अभियान सहा दिवस चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Lok Sabha 2024 BJP determined to increase 370 votes in each booth)
विधानसभा पातळीवर पक्षाच्या बूथ स्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच 50 प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहेत. मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य आहे, असेही पाठक यांनी नमूद केले.
हेही वाचा – Ramtek Sabha : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींची 10 एप्रिलला रामटेकला सभा
घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर, वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपचा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला अशा समाजातील विविध घटकांसाठी पाच समूह बैठकाही घेण्यात येतील. भाजपशी संबंधीत नसलेल्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य आणि योजना पोहोचवून भाजपला मत देण्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असेही पाठक यांनी सांगितले.
हेही वाचा – Mahayuti : लोकसभेच्या जागांसाठी शिंदेंची भाजपशी झुंज; उमेदवार निश्चितीत भाजपचा हस्तक्षेप