घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : काँग्रेसचे महायुतीला मोठे आव्हान; पटोले, वडेट्टीवार, प्रणिती शिंदे,...

Lok Sabha 2024 : काँग्रेसचे महायुतीला मोठे आव्हान; पटोले, वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, धंगेकर रिंगणात

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन पाच दिवस झाले तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, राज्यात महायुतीला रोखण्यासाठी तसेच गेल्या दोन निवडणुकांमधील पीछेहाट थांबविण्यासाठी काँग्रेसने आता दिग्गज उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. यादृष्टीनेच काँग्रेसने नाना पटोले, विजय वडेट्टीवार या दिग्गजांसह 12 उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. आज, गुरुवारी सायंकाळी या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Loksabha: दिल्ली दौऱ्यानंतर राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईत मध्यरात्री खलबते?

- Advertisement -

देशामध्ये एकूण सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध विरोधकांच्या ‘इंडि’ आघाडी अशी होण्याची चिन्हे आहेत. भाजपाने ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा दिली असली तरी, त्यांना पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही, असा दावा विरोधकांचा आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडून छोट्या-मोठ्या पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. महाराष्ट्रातील विरोधकांच्या महाविकास आघाडीत Adv. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन विकास आघाडीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र जागावाटपावर घोडे अडले आहे.

तर दुसरीकडे, भाजपाने 13 मार्च रोजी दुसरी यादी जाहीर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील यांना भाजपाने पुन्हा संधी दिली असून पीयूष गोयल, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मिहीर कोटेचा यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. मात्र, भाजपा तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा इतर जागांबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mahayuti : महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार? दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

महाविकास आघाडीचे जागावाटपाबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, नवी दिल्लीत काँग्रेसच्या सुकाणू समितीची बैठक झाली. 2014च्या मोदी लाटेत काँग्रेसला महाराष्ट्रात अवघ्या दोन जागा मिळाल्या. पण 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय झाली. पक्षाला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले. म्हणूनच आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा लाभ घेण्याबरोबरच निवडणुकीच्या रिंगणात तगडे उमेदवार उतरविण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्या अनुषंगाने दिल्लीतील बैठकीत 12 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

त्यानुसार, नाना पटोले यांना काँग्रेसकडून भंडारा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले जाईल. 2014च्या निवडणुकीत नाना पटोले भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यामुळे 10 वर्षांनी त्यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठविण्याचा विचार पक्षश्रेष्ठींचा आहे. चंद्रपूर मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबरच विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव देखील चर्चेत होते. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाने थेट राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाच तिकीट देण्याचे निश्चित केले, असेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – NCP : तुतारी, पक्षाचं नाव निश्चित ते इतर कोणालाही देता येणार नाही – जितेंद्र आव्हाड

याव्यतिरिक्त सोलापूरहून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमधील एका सभेत तसे संकेत दिले होते. प्रणिती शिंदे यांच्या नावाचे बटन दाबून आपल्याला त्यांना लोकसभेत पाठवायचे आहे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते. मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले वसंत मोरे हे पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीकडून लढविण्याची चर्चा होती. त्यांच्याबरोबरच आमदार रवींद्र धंगेकर यांचे नावही आघाडीवर होते. पण आता काँग्रेसने आमदार धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. भाजपाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

काँग्रेस उमेदवारांची यादी –

 • भंडारा – नाना पटोले
 • चंद्रपूर – विजय वड्डेटीवार
 • सोलापूर – प्रणिती शिंदे
 • कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज
 • अमरावती – बळवंत वानखेडे
 • नागपूर – विकास ठाकरे
 • पुणे – रवींद्र धंगेकर
 • नंदुरबार – गोवशा पडवी
 • लातूर – डॉ. शिवाजी काळगे
 • गडचिरोली – नामदेव किरसान
 • अकोला – अभय पाटील
 • नांदेड – वसंतराव चव्हाण

हेही वाचा – Uddhav Thackeray : मी केवळ मॅच पहात नाही तर खेळून जिंकतोही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -