मुंबई : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर अशी लढत होणार आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभेचा गड कायम राखेन, असा विश्वास प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : लोकशाहीचा आदर राखत विचारांची लढाई लढू, प्रणिती शिंदेंचे सातपुतेंना पत्र
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार सुरू केलेला असताना दुसरीकडे काँग्रेस उमेदवाराची घोषणा होत नव्हती. या मतदारसंघासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर खुद्द विजय वडेट्टीवार यांना तिकीट दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पक्षाने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली.
उमेदवारी मिळविण्यासाठी प्रतिभा धानोरकर यांना संघर्ष करावा लागला. याबद्दल त्या म्हणाल्या, ‘संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनी ही शानदार होगी’, असा स्टेटस काही दिवसांपासून मी सोशल मीडियावर ठेवला होता. येथील उमेदवारीवर कोणी दावा केला असेल, तर तो त्यांचा नैतिक अधिकार आहे. कारण काँग्रेस हा लोकशाहीवर चालणारा आणि संविधान मानणारा पक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या हेमंत गोडसेंचे शक्तिप्रदर्शन, शिंदेंकडून शब्द
आपले पती बाळू धानोरकर यांनी सर केलेला हा गड या निवडणुकीत कायम राखेन, असा विश्वास प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. भाजपाकडून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांच्याबद्दल प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ही लढाई सोपी नाही. पण तरीही माझ्यासाठी ही लढाई हुकूमशाही विरुदध लोकशाही अशी आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Loksabha 2024: भाजपाची पाचवी यादी जाहीर; अभिनेत्री कंगना रणौतला मंडीमधून उमेदवारी