सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा पाहायला मिळत होता. सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाम दावा करण्यात आला होता. ज्यामुळे महायुतीत या जागेवरून तिढा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पण आज अखेरीस या जागेवरील तिढा सुटला असून साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले कमळाच्या चिन्हावर या लोकसभेतून निवडणूक लढवणार आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. कारण भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून उदयनराजे यांना तशा प्रकारचा शब्द देण्यात आला आहे. याबाबतची माहिती आता स्वतः उदयनराजे यांच्याकडून देण्यात आली आहे. (Lok Sabha 2024: Udayanaraje Bhosale from Satara Lok Sabha has been confirmed as a candidate from Mahayuti)
हेही वाचा… Lok Sabha 2024 : वसंत मोरेंची मराठा समाजाला साद, मनोज जरांगेंची घेणार भेट
उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेत त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर ते आज (ता. 27 मार्च) साताऱ्यात पोहोचले. यावेळी साताऱ्याच्या सीमेवर म्हणजेच शिरवळ-निरा नदीजवळ समर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात उदयनराजे भोसले यांचे स्वागत करण्यात आले. तर जेसीबीत्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. यावेळी उदयनराजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “साताऱ्यात लोकांनी केलेले स्वागत पाहून मन भारावून गेले आहे. कालही मी जनतेचा होतो, आजही आहे आणि भविष्यातही लोकांच्या हिताचे निर्णय घेणार आहे. तसेच, मला या भव्य स्वागतामधून कोणालाही इशारा द्यायचा नाही. सगळं काही ठरलेलं आहे. निवडणूक मी लढणारच आहे. साताऱ्यात कधीतरी यायचे होते. आज मुहूर्त मिळाला आणि पोहोचलो. समर्थकांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत,” असे उदयनराजे म्हणाले.
तर, याआधीही माझे दिल्ली दौरे सुरू होते. मधल्या काळात दिल्लीला जावे लागले. मला ताटकळत ठेवले असे सांगण्यात आले. पण तसे काहीही झाले नाही. ती सर्व चुकीची माहिती होती. आज फक्त महाराष्ट्र नाही तर देशभरात निवडणुका आहेत. पहिल्या टप्यात उमेदवार जाहीर झाल्यानंतर जो तिढा निर्माण झाला होता तो आता सोडविण्यात आला आहे. यात कोणतीही शंका नाही. पक्षश्रेष्ठींना मला जे काही सांगायचे होते ते त्यांनी सांगितले आहे. तसंच अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजपातील सहकारी, घटक पक्ष यांच्यासोबत बोलणे झाले असून शंका घेण्याची गरज नाही, असेही उदयनराजे भोसले यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
सातार लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तिढा निर्माण झाला होता. अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला होता. पण उदयनराजे यांच्या विधानामुळे राष्ट्रवादीने माघार घेतली असावी, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यादरम्यान सातारा लोकसभा भाजपाला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.