मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बुधवारी (ता. 15 मे) मुंबई उपनगरातील घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रोड शो होणार असून त्यांच्या या रोड शोवर आता विरोधकांकडून टीकास्त्र डागण्यात येत आहे. महाविकास आघाडीने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर आणले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान जिथे जिथे जाणार, तिथे तिथे मविआ जिंकणार असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024 Sanjay Raut claims that wherever PM Narendra Modi goes, MVA will win)
प्रसार माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना पंतप्रधान मोदी यांचा मुंबईत होणाऱ्या रोड शोबाबत विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर आणले आहे. गल्लीगल्लीत, रस्त्यावर पंतप्रधानांना भाजपावाले पराभवाच्या भीतीने फिरवत आहेत. मुंबईतल्या सहा जागांवर आम्ही लढतोय. त्यातल्या सहा पैकी सहा जागा जिंकण्याचा आमचा इरादा आहे. मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावे लागत आहे. नाशिक, कल्याण आणि घाटकोपर इथे येणार आहेत. पण, तुमच्यावर दारोदार भटकण्याची आणि रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे लोकांना कळू द्या. पंतप्रधान देशभरात रोड शो करतात, त्यांना दुसरे काम नाही का? असे प्रश्न राऊतांकडून उपस्थित करण्यात आले आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : ते असंवेदनशील…, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील रोड शोवर राऊतांचे टीकास्त्र
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात रोड शो करतात. दुसरं काम नाही का?. मणिपूरला गेले नाहीत. जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांचे अश्रू पुसायला गेले नाहीत. पण आता महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतलाय. उमेदवार कोणी असो, मोदी नको. मोदी गो बॅक ही गावागावातील घोषणा आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जिथे जाणार, तिथे महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. आतापर्यंत जिथे निवडणुका झाल्यात तिथे 90 टक्के जागा मविआ जिंकणार, असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.
असा असेल पंतप्रधान मोदींचा रोड शो…
संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान मोदींचे विक्रोळी येथे आगमन होईल. त्यानंतर 6.45 मिनिटांनी हा रोड शो सुरू होईल आणि 7.45 ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम. जी. रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर ते घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे संपेल.
हेही वाचा… Lok Sabha 2024 : पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत भव्य रोड शो, तर नाशकात सभा