घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : कल्याणमध्ये ठाकरे गटाची खेळी; श्रीकांत शिंदेंविरोधात लढणाऱ्या वैशाली...

Lok Sabha 2024 : कल्याणमध्ये ठाकरे गटाची खेळी; श्रीकांत शिंदेंविरोधात लढणाऱ्या वैशाली दरेकर कोण?

Subscribe

कल्याण लोकसभेतून कट्टर शिवसैनिक वैशाली दरेकर यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होताच वैशाली दरेकर यांनी कल्याणाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे.

डोंबिवली : लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला 19 एप्रिल रोजी सुरूवात होणार आहे. मात्र अद्याप जागावाटपाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून कट्टर शिवसैनिक वैशाली दरेकर यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होताच वैशाली दरेकर यांनी कल्याणाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. तर एका स्थानिकाला संधी देत ठाकरे गटाने वैशाली यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मोठी खेळी खेळली आहे. (Lok Sabha Election 2024 Who is Vaishali Darekar of Thackeray group fighting against Srikant Shinde)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून प्रथमच स्थानिक उमेदवार, उपरा उमेदवार नको असल्याची मागणी पूर्ण

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण लोकसभेसाठीची चाचपणी सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राला म्हणजेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोण आव्हान देऊ शकते, यासाठी पूर्ण अभ्यास ठाकरे गटाकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे ठाकरे गटाने शिंदेंविरोधात महिला उमेदवाराला निवडणुकीच्या रणांगणात उतरवत खेळी खेळली आहे. र्वाश्रमीच्या मनसेच्या नगरसेविका राहिलेल्या वैशाली दरेकर-राणे त्याच पक्षाकडून 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढल्या होत्या.

वैशाली दरेकर यांचे नाव याआधी कधीही चर्चेत नव्हते. परंतु, आज ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत त्यांच्या नावाची कल्याण लोकसभेतून घोषणा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उत्तम वक्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशाली दरेकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत डोंबिवली विभागातील गोग्रासवाडी भागातून मनसेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले आहे. त्या विरोधी पक्षनेत्या देखील होत्या. महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती पद त्यांनी भुषविले होते. पालिकेत विरोधी पक्षनेत्या असताना शहरातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात त्यांचा पुढाकार होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्वाचे विषय लावून धरून अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन नागरी समस्या, विकास कामांचे विषय मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा होता.

- Advertisement -

मनसेमध्ये त्यांनी प्रदेश पातळीपर्यंत कामे केली. मनसेमध्ये असताना अनेक आंदोलने, उपोषणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. परंतु, मनसेमध्ये कोंडी होऊ लागल्याने त्या मनसे पक्षातून बाहेर पडल्या आणि शिवसेनेत दाखल झाल्या. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा बरोबर राहणे पसंत केले होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्या विरुध्द मनसेकडून निवडणूक लढविली होती. त्यांना एक लाख दोन हजार ६३ मते त्यावेळी मिळाली होती.

गेल्या महिन्यांपासून त्या ठाकरे गटात सर्वाधिक सक्रीय असल्याच्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना ठाकरे गटाचे महिला संघटनेचे पद दिले होते. पण त्यांचे काम आणि संघटन पाहून त्यांना आता उद्धव ठाकरे यांच्याकडून थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यामागे मातोश्रीच्या विश्वासातील ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांचा महत्वाचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण लोकसभेमध्ये स्थानिक उमेदवाराला संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला गांभीर्याने घेत उद्धव ठाकरेंनी कोणत्याही बड्या नेत्याला उमेदवारी न देता स्पष्ट वक्ता असलेल्या वैशाली दरेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राविरोधात उभे केले आहे. कल्याण लोकसभेमध्ये माजी आमदार सुभाष भोईर, युवासेनेचे वरूण सरदेसाई, सुषमा अंधारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, या कोणालाही उमेदवारी न देता एका स्थानिक महिलेला उमेदवारी देत ठाकरे गटाने मोठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024: उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून वैशाली दरेकर मैदानात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -