मुंबई : लोकसभा निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर झाला असून, अनेक राजकीय पक्षांनी उमेदवारांबरोबरच स्टार प्रचारकांच्याही याद्या जाहीर केल्या आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्टार प्रचाराकांच्या यादीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. त्याची दखल घेत आयोगाने त्यासंदर्भात शिवसेनेला निर्देशही दिले आहेत.
हेही वाचा – Lok Sabha 2024: आमच्या तर वाघाच्या गर्जना; ते नारा द्यायच्या लायकीचे…; राऊतांचा हल्लाबोल
लोकसभा निवडणूक 2024साठी महायुतीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर एनसीपी एसपीने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत, त्या शिवसेना पक्षाने आपल्या यादीत दोन चुका केल्या असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिले आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये जी व्यक्ती बसलेली असते, तिचे नाव लिहिण्यास परवानगी आहे. पण त्यांच्या पदाचे नाव लिहिण्यास परवानगी नसते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या यादीत नरेंद्र मोदी – पंतप्रधान, अमित शहा – गृहमंत्री, एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नितीन गडकरी – केद्रीय मंत्री, रामदास आठवले – केंद्रीय मंत्री, देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, अजित पवार – उपमुख्यमंत्री अशी यादी जाहीर केली आहे, असे एनसीपी एसपीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.
शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल केलेल्या आमच्या तक्रारीवर राज्य निवडणूक आयोगाचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे. आमच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, राज्य निवडणूक आयोगाने इतर राजकीय… pic.twitter.com/X5sdHlB9DV
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 3, 2024
एनसीपी एसपीने यासंदर्भात आता ट्वीट करून आमच्या या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतल्याचे म्हटले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल केलेल्या आमच्या तक्रारीवर राज्य निवडणूक आयोगाचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे. आमच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, राज्य निवडणूक आयोगाने इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नावाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक पदाचा उल्लेख केल्याचे नमूद करत शिवसेनेने (एकनाथ शिंदे) लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम 77चे उल्लंघन केल्याचे मान्य केले असल्याचे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – Loksabha Election 2024 : किरण सामंत यांच्या माघारीनंतर बंधू उदय म्हणतात…, आमचा दावा कायम
शिवसेनेला (एकनाथ शिंदे) त्यांच्या यादीतील नेते हे त्यांच्याच पक्षाचे सदस्य असल्याचे प्रमाणित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, त्यात अनेक भाजपा नेत्यांची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांची देखील नावे आहेत. तसेच, भारतीय जनता पक्षाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम 77अंतर्गत स्टार प्रचारकांची कोणतीही यादी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली नाही अशी नोंद आहे, परिणामी त्यांना किमान पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी प्रवास खर्चाच्या सवलतीस नकार देण्यात आला असल्याचे एनसीपी एसपीने म्हटले आहे.
हेही वाचा – VBA : सकाळी पक्ष प्रवेश संध्याकाळी उमेदवारी; वंचितकडून अफसर खान देणार इम्तियाज जलील यांना टक्कर