कोल्हापूर : महाविकास आघाडीतर्फे शाहु महाराज यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराज यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीची घोषणा केली. (Lok Sabha ticket for chhatrapati Shahu Maharaj in Kolhapur Uddhav Thackeray announcement)
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी छत्रपती शाहू महाराज यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि शाहू महाराज हे माध्यमांसमोर आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “कोल्हापुरात आज छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. आणखी काही सांगण्याची अवशक्यता नाही. ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत. त्यामुळे मला आंनद आहे की, या पिढीसह पुढच्या पिढीत ते असेच घनिष्ठ राहतील. आज महाविकास आघाडीतर्फे शाहु महाराज यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराज यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराला येऊच पण विजयाच्या सभेलाही येऊ असे वचनही मी छत्रपती शाहु महाराजांना दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय, “नुसतं एवढं बोलून मी थांबलो नाहीतर, माझाही स्वार्थ साधला. महाराजांकडून पुढच्या संघर्षात विजय मिळवण्यासाठी आशिर्वाद घेतला आहे. 1997-98 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे इथे आले होते. त्यानंतर आता मी इथे आलो. यापुढेही येत राहीन”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र काही दिवसांपासून काँग्रेसच्या पहिल्या यादीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. राज्यात महायुतीला रोखण्यासाठी तसेच गेल्या दोन निवडणुकांमधील पीछेहाट थांबविण्यासाठी काँग्रेसने आता दिग्गज उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. यादृष्टीनेच काँग्रेसने नाना पटोले, विजय वडेट्टीवार या दिग्गजांसह 12 उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. आज, गुरुवारी सायंकाळी या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : काँग्रेसचे महायुतीला मोठे आव्हान; पटोले, वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, धंगेकर रिंगणात