Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : बारामतीचं ठरलं; नणंद - भावजयीतच होणार लढत

Lok Sabha 2024 : बारामतीचं ठरलं; नणंद – भावजयीतच होणार लढत

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. त्यातच राज्यातील काही मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत. यात बारामती मतदारसंघाचा समावेश होतो. पूर्वीपासून पवार कुटुंबियांचे होम पीच असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर कोण उमेदवार असतील, याची चर्चा रंगली होती. तो सस्पेन्स शनिवारी, ३० मार्च रोजी संपला. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून शनिवारी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना संधी दिली. तर राष्ट्रवादी पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघात नणंद – भावजयीची लढत होणार, हे नक्की आहे.

बारामती हा पूर्वीपासून पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीत फूट पडली नसती तर या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून लढतील, हे निश्चित होते. पण, राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार काही आमदारांसह वेगळे झाले. त्यामुळे या मतदारसंघात सुप्रिया सुळेंसमोर कोण उभे राहणार हा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. काही काळाने अचानक सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आले. आणि महायुतीकडून बारामतीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील, हे निश्चित झाले. हे सगळं ठरलं असलं तरी सुप्रिया सुळे – सुनेत्रा पवार यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नव्हती. ती शनिवारी जाहीर करण्यात आली.

- Advertisement -

शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाने महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी देत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, त्यावेळी बारामतीचा उमेदवार त्यांनी जाहीर केला नव्हता. याच दरम्यान, राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर केली. त्यात बारामतीसाठी सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली.

एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती समोरासमोर असल्याने ही निवडणूक आधीपासूनच चर्चेत होती. त्यातच सुप्रिया सुळे राजकारणात अनेक वर्षे असल्या तरी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या काही राजकारणात सक्रिय नाहीत. घरी राजकारणाचे वातावरण असले तरी सुनेत्रा पवार यापासून लांबच राहिलेल्या दिसतात. त्यामुळेच चर्चा असली तरी सुनेत्रा पवारांसारख्या नवख्या व्यक्तीला सुप्रिया सुळे यांच्यासमोर उतरवतील का, याबद्दल शंका होती. मात्र, सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही त्यांनी मतदारसंघाचे दौरे, लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती.

- Advertisement -

सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया

सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भावना व्यक्त करताना आजचा दिवस आयुष्यातील सर्वात भाग्याचा असल्याचं म्हटलं. तसेच ही संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. शिवजयंतीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याला भेट दिली आणि महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर होणं हा सुवर्णक्षण असून, सन्मानच असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. जाईन तिथे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तो पाहून ते दादांच्या पाठीशी उभी राहतील असं दिसत आहे असंही त्या म्हणाल्या. माझी उमेदवारी जनतेने ठरवली आहे. ही निवडणूक जनतेच्या हातात आहे असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार गटाकडून उमेदवारांची घोषणा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 5 उमेदवारांचा समावेश करण्यात आला. अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत स्वगृही परतलेल्या निलेश लंके यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -