Homeमहाराष्ट्रLoksabha Election 2024: जरांगेंनी जालन्यातून निवडणूक लढावी, वंचितचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन

Loksabha Election 2024: जरांगेंनी जालन्यातून निवडणूक लढावी, वंचितचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन

Subscribe

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी. वंचित बहुजन आघाडीचा त्यांना पाठिंबा आहे.

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी. वंचित बहुजन आघाडीचा त्यांना पाठिंबा आहे. तशा सूचनाही आम्ही त्यांना पाठवणार आहोत. जरांगेंनी जालन्याच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी, त्यांनी निवडणूक लढवली तर ते जिंकून येतील आणि गरीब मराठ्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. (Loksabha Election 2024 Manoj Jarange Patil should contest from Jalana support of Vanchit Bahujan Aaghadi Appeal of Prakash Ambedkar)

जरांगेंनी लोकसभेत उतरावं

ओबीसींच्या ताटातलं आरक्षण टिकणार नाही. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. शिंदे आयोगाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. लोकसभेच्या आधी सरकारला एक अधिवेशन घ्यावं लागेल. हे फसवं राजकारण आहे का? कळत नाही. मनोज जरांगे पाटील यांना आम्ही निरोप दिला आहे, की त्यांना हा लढा शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही. उपोषणाने जागृती करायची होती ती केली. आता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वत: हून जालन्यात स्वतंत्र लढाई लढली पाहिजे. गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत ते गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे.

मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. सरकारने त्यांना अधिवेशनात मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. लवकरच निवडणुका होणार आहेत. त्याआधी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे लवकरच निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय जरांगेंना घ्यावा लागणार आहे. राज्य सरकारला अधिवेशन घ्यावं लागेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोदी रिंगमास्टर

प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोदींना ज्यांना नाचवायचं त्यांना ते नाचवतात. जे तयार होणार नाहीत, त्यांना ते ईडी, सीबीआयच्या मार्गाने त्रास देतात, असं मी आधीच सांगितलं होतं.

(हेही वाचा: Manoj Jarange : समजूत काढायला आलेल्या अधिकाऱ्यांवर जरांगे संतापले, म्हणाले – “इथून निघून जा…”)