पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमासाठी जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोले यांची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात असून ही जनतेच्या पैशांची लूट आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज, बुधवारी येथे केली. मुंबईजवळच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होऊन सहा वर्षे झाली, त्याचे काय झाले? असा सवाल करताना पटोले यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही मोदींनी आपल्या सभेत बोलावे, असा सल्ला दिला.

नरेंद्र मोदी हे उद्या, गुरुवारी मुंबईत येत आहेत. मोदींच्या दौऱ्यासाठी तसेच वांद्रे कुर्ला संकुलातील सभेसाठी सरकारने जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तयारीचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पटोले यांनी मुंबईच्या दौऱ्यावरून मोदींवर टीका केली. वाढत्या महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. देशात बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. या प्रश्नावरही पंतप्रधानांनी बोलले पाहिजे. भाजपा सरकार अन्नदात्याची गळचेपी करण्याचे काम करत असून त्यावरही त्यांनी बोलावे. मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी सरकारी पैशातून अनेक वर्तमानपत्रात पानभर जाहिराती देऊन वारेमाप प्रसिद्धी केली आहे, असे पटोले म्हणाले.

जी-20 परिषदेसाठी मुंबई विमानतळाच्या परिसरात पडदे लावून मुंबईचे ‘खरे दर्शन’ होऊ नये याचा प्रयत्न केला होता. त्या कापडावर मोदींचे फोटो लावून ठेवले होते. आताही मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमासाठी मोठी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. पण मोदी त्यावर बोलत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपा हिंदू-मुस्लीम विषयावर राजकारण करत आहे. भाजपाला पराभव दिसू लागल्याने आता त्यांना मुस्लीम समाजाची आठवण झाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजाबरोबर संवाद वाढवण्याचे आवाहन भाजपा कार्यकर्त्यांना केले. मुस्लीम समाजाबद्दल मोदी किंवा भाजपाला प्रेम नाही. भाजपाचा कोणताही धर्म नाही. केवळ सत्ता हाच त्यांचा धर्म आहे आणि ‘मोदी है तो मुमकीन है’, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

काँग्रेसमध्ये कोणताच गोंधळ नाही
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये योग्य समन्वय आहे. काँग्रेस पक्षात कोणताच गोंधळ नाही. नाशिक मतदारसंघात भाजपला उमेदवारही मिळाला नाही. दुसऱ्यांचे घर फोडणे हीच भाजपाची परंपरा आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवत असून पाचही जागांवर आघाडीला विजय मिळेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.