घरमहाराष्ट्रमालाड येथील भीषण आगीत झोपड्या खाक

मालाड येथील भीषण आगीत झोपड्या खाक

Subscribe

मुंबई : मालाड (पूर्व), आनंद नगर, आप्पापाडा येथे दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीला सोमवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. अनेक गरिबांच्या संसाराची राखरांगोळी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, मात्र झोपड्या जळाल्याने त्यामध्ये राहणार्‍या झोपडीधारकांना नव्याने निवारा व्यवस्था होईपर्यंत तरी मुलाबाळांसह म्हणजे संपूर्ण कुटुंबीयांसह रस्त्यावर अथवा जवळच्या एखाद्या नातेवाईकांकडे राहण्याची नामुष्की ओढवणार आहे.

या आगीवर अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला, अन्यथा आजूबाजूच्या शेकडो झोपड्याही जळून खाक झाल्या असत्या. प्राथमिक माहितीनुसार मालाड (पूर्व), आनंद नगर, आप्पापाडा येथे सोमवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास झोपडपट्टीमधील बहुतांश लोक नोकरीधंद्यासाठी घराबाहेर गेलेले असताना अचानक आग लागली. ही आग का व कशी, कुठे लागली हे झोपडीधारकांना समजण्यापूर्वीच आग झपाट्याने पसरत गेली. आगीची माहिती मिळताच झोपडीधारकांनी आपली मुले व नातेवाईकांसह झोपडपट्टीमधून बाहेर पडून हाताला जे काही महत्त्वाचे सामान लागेल ते घेऊन सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला, मात्र स्वतःच्या कमाईमधून अगदी पै पै जोडून बनवलेल्या घराची आगीत राखरांगोळी होताना स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना नाईलाजाने पाहावे लागले. झोपडीधारक विशेषतः महिला मंडळी त्यांच्या झोपड्या, संसार, सामान आगीपासून वाचविण्यासाठी आरडाओरडा करीत होत्या.

- Advertisement -

या आगीत झोपड्यांमधील गॅस सिलिंडरचे एकामागून एक भीषण स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आगीचा आणखीन भडका उडाला. दूर अंतरावरून आगीचा काळाकुट्ट धूर व आगीच्या ज्वाळा दिसून येत होत्या. त्यामुळे आग बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी यंत्रणेसह धाव घेतली व युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम हाती घेतले. तोपर्यंत आग भडकली होती. आग लागल्यावर अवघ्या १०-१५ मिनिटांत आग भडकली व आग स्तर १ ची झाली. त्यानंतर पुढील चार मिनिटांत म्हणजे आग आणखीन भडकल्याने सदर आग स्तर २ ची झाल्याचे व त्यानंतर पुढील ९ मिनिटांनी सदर आग स्तर ३ ची झाल्याचे जाहीर करण्यात आले.
झोपडपट्टीतील आग भीषण स्वरूपाची झाल्याने अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी आणखीन कुमक मागविली. घटनास्थळी १० फायर इंजिन, ६ जम्बो वॉटर टँकर यांच्या साह्याने आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

- Advertisement -

आगीवर नियंत्रण
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सदर झोपड्यांना लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, मात्र आगीचे नेमके कारण माहिती नाही. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
-सुहास वाडकर, माजी उपमहापौर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -