घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी जोरात धडपड

महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी जोरात धडपड

Subscribe

महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांभोवतीचा ईडीचा फास आवळत चालल्यामुळे या सरकारवर अस्थिरतेचे ढग कायम असल्याचे दिसत आहेत. सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत असल्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार वाचवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. आता आणखी एक माहिती समोर आली असून मंगळवारी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या गुप्त बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे उपस्थित होते.

संजय राठोड आणि अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचे राजीनामे द्यावे लागल्यानंतर आता अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि अजित पवार हे ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास आवळत चालला आहे. विशेष म्हणजे मनी लॉन्ड्रिंग आणि बार मालक तसेच बदल्यांसाठी खंडणी वसूल केल्याच्या त्यांच्या विरोधातील आरोपांना आता पुष्टी मिळत चालली असून त्यांचे खासगी सचिव संजीव पालांडेने ईडीसमोर तशी साक्ष दिल्याचे समोर आले आहे. यानंतर अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि अजित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरु होईल, असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ही गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

या बैठकीला केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मोजकेच नेते उपस्थित होते. या बैठकीचे ठिकाण अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीची कुणालाही माहिती नव्हती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली असून पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे या गुप्त बैठकीला काँग्रेसचा एकही नेता नव्हता. आधीपासूनच सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवले आहे. अनेक महत्त्वाच्या निर्णयातून काँग्रेसला डावलले जात असून आता या बैठकीपासूनही काँग्रेसला दूर ठेवल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नेमकी काय खिचडी शिजतेय? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सोमवारपासून सुरु होणार्‍या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे हे सरकार कधीही पडू शकते, असा छातीठोक विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. यासाठीच ते पक्षाच्या कार्यकारिणीत अजित पवार आणि अनिल परब यांच्या चौकशीचे ठराव मांडत आहेत. मुख्य म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या नेत्यांच्या चौकशीची मागणी केली गेली आहे. यामुळेच अस्वस्थ झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -