भोंगा प्रकरण…राज्यात तणाव…खोपोलीत मात्र ऑल इज वेल

महाराष्ट्रात गेले काही दिवस मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण या मुद्द्यावर वातावरण तापले होते. त्यानुसार ४ मे २०२२ या दिवसापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अल्टिमेटमही दिले गेले होते. आज ४ मे रोजी खोपोली शहरातील सात आणि खालापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सात मशिदीमध्ये पहाटेची बांग दिली गेली. मात्र त्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर केला गेला नसून सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे अनुपालन करण्याचा संकल्प यानिमित्ताने केला गेल्याचे चित्र दिसून आले.

खोपोली आणि खालापूर पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरातील सर्वच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील घटकांनी या निमित्ताने एकत्र येऊन सार्वजनिक सुरक्षेला बाधा येणार नाही आणि कायदे भंग होणार नाही याचे भान ठेवल्याचे चित्र आज रोजी दिसल्याने वातावरणातील ताण ओसरण्यास सुरूवात झाली आहे.

अक्षय तृतीया आणि रमजान ईदच्या निमित्ताने दिसून आलेला भाईचारा असाच यापुढेही राहील याचे खोपोली शहरात स्पष्ट संकेत दिसून आले आहेत. या दरम्यान कोणीही अवास्तव आक्रमकपणा न दाखविता सामाजिक एकोपा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता सामंजस्याची भूमिका स्वीकारली असल्याची बाब निश्चितच स्पृहणीय आहे. खोपोली आणि खालापूर तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी देखील या भूमिकेचे स्वागत करीत असल्याच्या प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकांतून प्रतिबिंबित होत आहेत.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आज मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले असून मुंबईतील चारकोप, चांदिवली भागात अजानवेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली, तर दुसरीकडे मुंबईतील माहीम, मुंब्रा, भिवंडी मालेगाव, पुण्यासह अनेक ठिकाणी भोंग्याविना नमाज पठण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, नांदेडमध्येही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नाटीस बजावण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना १४९ कलमान्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे.


हेही वाचा : पोलिसांची धरपकड सुरू, मनसैनिकांना पोलिसांकडून अटक