घरमहाराष्ट्रRaj Thackeray Loudspeakers Row : भोंग्याविरोधात मनसे आक्रमक; राज्यभरात कडक बंदोबस्त

Raj Thackeray Loudspeakers Row : भोंग्याविरोधात मनसे आक्रमक; राज्यभरात कडक बंदोबस्त

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्यामुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेय. ठाण्यातील सभेत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि तोचं मुद्दा पुन्हा औरंगाबादच्या सभेतही लावून ठरला. यावेळी त्यांनी हे भोंगे उतरवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला ३ मेपर्यंतचे अल्टिमेटम दिला होता. मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई झाली नाही तर त्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरेंनी यांनी केले होते. त्यानुसार राज्यातील विविध ठिकाणी मनसैनिकांनी आता मशिदींवरील भोंग्यांसमोर अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर राज्यातील काही ठिकाणी अजानशिवाय नमाज पठण करण्यात आले. मात्र दुसरीकडे राज ठाकरेंविरोधात शिराळा कोर्टाने एका प्रकरणात अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यानुसार राज ठाकरेंना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे आक्रमक मनसैनिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. हजारो मनसैनिकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. दरम्यान राज्यातील एकूण काय परिस्थिती आहे जाणून घेऊ,….

मुंबईतील माहीम, मुंब्रा, भिवंडी मालेगाव, पुण्यासह अनेक ठिकाणी भोंग्याशिवाय अजान

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आज मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले असून मुंबईतील चारकोप, चांदिवली भागात अजानवेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली, तर दुसरीकडे मुंबईतील माहीम, मुंब्रा, भिवंडी मालेगाव, पुण्यासह अनेक ठिकाणी भोंग्याविना नमाज पठण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या घराबाहेर बॅरिकेटिंग

सुरक्षेच्या कारणास्तव डीसीपींकडून आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थान परिसराची पाहणी करण्यात आली असून घराबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.

औरंगाबादमध्ये मनसैनिक भूमिगत, कडकोट पोलीस बंदोबस्त

औरंगाबादमध्ये 48 मशिदींबाहेर पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तर कार्यकर्त्यांना 149 च्या नोटीसा बजावण्यात आल्या असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शहरातील मनसेचे कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत. यामध्ये जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, राजीव जावळीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

नवी मुंबईत मनसैनिकांची धरपकड

नवी मुंबईत पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून मनसैनिकांची धरपकड सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष प्रसाद घोरपडे यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहे. मंगळवार रात्रीपासून पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

नशिकमध्ये हनुमान चालीसा लावून मनसे कार्यकर्त्यांनी ठोकली धूम

जुने नशिकमधील छपरीच्या तालीम परिसरातील जबरेश्वर मंदिरावर पहाटे मनसे कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली होती. यावेळी मंदिराच्या दोन्ही बाजूस 100 मीटर अंतरावर पोलीस बंदोबस्त होता, अशा परिस्थितीत मनसैनिकांनी अटक होण्याच्या भीतीने हनुमान चालीसा लावून तेथून धूम ठोकली. तर नाशिकच्या सातपूर परिसरात भोंगा लावण्याच्या तयारीत असणाऱ्या  6 मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भद्रकाली पोलिसांनी जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे.

नाशिकमध्ये 29 मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमध्ये सकाळपासून पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. तर 29 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेय. यापैकी काही जणांना पोलिसांनी तडीपारची नोटीस बजावली आहे.

बुलढाण्यात मनसैनिकांचा लाऊडस्पीकर घेतला ताब्यात

बुलढाण्यातील खामगाव शहरातील चांदमारी भागातील हनुमान मंदिरात जाऊन पोलिसांनी लाऊडस्पीकर मशीन ताब्यात घेतली आहे. या भागातील हनुमान मंदिरावर लाऊडस्पीकर लावुन हनुमान चालीसा दररोज सकाळी सहानंतर आरतीच्या वेळेस वाजवण्यात येतो. परंतु आज शहर पोलीसांनी सकाळी पाच वाजेदरम्यान चांदमारी येथील मंदिरात जाऊन साऊंड सिस्टीम मशीन ताब्यात घेतली. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

नांदेडमध्ये मनसे कार्यकर्त्यांना नोटीस

नांदेडमध्येही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांना 149 कलमान्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कोणत्याही धार्मिक स्थळी भोंगा, साऊंड सिस्टम लावून नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यातील पुण्येश्वर मंदिरात आज मनसेकडून महाआरती

पुण्यातील पुण्येश्वर मंदिरात आज मनसेकडून महाआरतीची तयारी करण्यात आली आहे. तर पुण्यातील इतर ठिकाणी शांततेत अजान सुरु आहे. याशिवाय प्रत्येक मशिदीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. पुण्यात सर्व ठिकाणी पहाटेची अजान नियमितपणे शांततेच्या वातावरणात पार पडली. दरम्यान नाना पेठेतील चांदतारा मशीद परिसरात पोलिसांचे पायी पेट्रोलिंग सुरु होते.

मुंबईच्या लोकलमध्येही वाचली हनुमान चालिसेचं पठण

मुंबईच्या ट्रेनमध्येही आज हनुमान चालिसेचं पठणं करण्यात आली. यावेळी भजन मंडळींनी हनुमान चालीसा वाचली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -