घरमहाराष्ट्रMITRA : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'मित्र' वादाच्या भोवऱ्यात; बंगला, महागडी गाडी अन्...

MITRA : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘मित्र’ वादाच्या भोवऱ्यात; बंगला, महागडी गाडी अन् बरेच काही…

Subscribe

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्र’च्या नियामक मंडळासाठी मलबार हिल येथे बंगला, नरिमन पॉईंट येथे कार्यालय तर 15 लाखांची कार दिल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात वर्षभरापूर्वी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. याचे उपाध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असल्याने ही नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तर, आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर देखील मुंबई महानगरपालिकेकडून कृपादृष्टी दाखविली जात असल्याने नवा वाद उद्भवला आहे. या माजी सनदी अधिकाऱ्याला मलबार हिल येथे बंगला, महागडी मोटार आणि कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने हा वाद गुरुवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हा अधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत जवळचा समजला जातो आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोअर टीममध्ये असल्याने त्याच्या निवासस्थानासाठी शिंदे यांनी शब्द टाकल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असताना सरकार ‘शासन आपल्या दारी’चा डंका पिटतंय – वडेट्टीवार

- Advertisement -

‘मित्र’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले प्रवीण परदेशी यांना मलबार हिल येथे बंगला, नरिमन पॉईंट येथे कार्यालय तर 15 लाखांची नवी कोरीकरकरीत कार दिल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मित्र संस्थेचे कार्यालय सुरू करण्यासाठी नरिमन पॉइंट परिसरातील महागड्या गगनचुंबी इमारतीत जागा घेतली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत शिंदे सरकारकडून 1200 चौरस फूट जागा दिली होती, परंतु मित्रच्या अधिकाऱ्यांनी ही जागा कमी असल्याचा दावा केला होता. त्यामुळे सप्टेंबर 2023मध्ये राज्य सरकारकडून निर्मल भवन येथे आठ हजार चौरस फुटांचे कार्यालय हे भाड्यावर घेण्याचा निर्णय घेतला. हे भाडे वर्षाला जवळपास अडीच कोटी रुपये असल्याने यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचप्रमाणे, मित्रच्या अंतर्गत सीईओला 15 लाख रुपयांची कार खरेदी करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.

पण या सर्वांमध्ये वादग्रस्त ठरला, प्रवीण परदशी यांना मलबार हिल येथील दिलेला बंगला. मुळात हँगिंग गार्डनच्या जवळ असलेला हा बंगला मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येतो. मुंबई मनपाकडून तो माजी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकरिता मिळविण्यात आला. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमलेल्या एका समितीवरही परदेशी कार्यरत आहेत. माझे मुंबईत कोठेही शासकीय निवासस्थान नसल्याने ते उपलब्ध करून देण्याची विनंती मी राज्य सरकारला केली होती. मुंबईत ‘मित्र’साठी काम करताना यामुळे मला निश्चित असे निवासस्थान उपलब्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण परदेशी यांनी बंगला मिळाल्यानंतर दिली होती. तसेच, आपण ‘मित्र’साठी काम करण्याचा कोणताही मोबदला घेत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.

- Advertisement -

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘मित्रा’साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेहेरबान झाल्याचे दिसते, अशी टिप्पणी केली आहे. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे आपल्या मित्रांसाठीच कारभार करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचा टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी

मलबार हिलमधील हा बंगला मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या ताब्यात होता. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना फोन करून तो बंगला प्रवीण परदेशी यांना देण्यास सांगितले होते. यापूर्वी मित्रच्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली होती. त्यापैकी बांधकाम क्षेत्र, सामाजिक, नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले अजय आशर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जातात. चार महिन्यांपूर्वी श्रावण हर्डीकर यांची मुंबई महापालिकेतून केवळ दोन महिन्यांतच नागपूर महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे, हे उल्लेखनीय.

मलबार हिलचा बंगला पुन्हा चर्चेत

अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेला प्रवीण परदेशी यांना देण्यात आलेला मलबार हिलचा बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2014मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेले प्रवीण दराडे यांना हा बंगला देण्यात आला होता. 2020मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने हा बंगला पालकमंत्री अस्लम शेख यांना दिल्याने सनदी अधिकारी दराडे यांना हा बंगला रिकामा करावा लागला होता. त्यावेळी याची जोरदार चर्चा झाली होती. आता पुन्हा प्रवीण परदेशी यांना तोच बंगला दिल्याने यावरून राजकारण रंगले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -