मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, संजय राऊतांचा भाजपला इशारा

जे चित्र निर्माण केलं जातंय, भूकंप होईल वगैरे, त्यात मला आणि शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद असं वातावरण निर्माण झालेलं आहे. तेसुद्धा दूर होईल, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

मुंबईः महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडावं अशा प्रकारची एक हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला आहे. संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

नक्कीच काही आमदार मुंबईत नाहीत. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काही आमदारांचा संपर्क होत नाही हे सत्य आहे. पण आज सकाळपासून अनेक आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदेसुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत, त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. जे चित्र निर्माण केलं जातंय, भूकंप होईल वगैरे, त्यात मला आणि शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद असं वातावरण निर्माण झालेलं आहे. तेसुद्धा दूर होईल, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

आता आम्ही सगळे वर्षावर जात आहोत. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे. आज सकाळपासून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. मग ते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असतील. महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडावं अशा प्रकारची एक हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करण्यासारखं असल्याचंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

भाजपचे जे अध्यक्ष आहेत मंगल प्रभात लोढा त्यांनी कालच्या विधान परिषदेच्या विजयानंतर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. त्यांची पावलं कोणत्या दिशेनं पडतायत ती समजून घ्या. मुंबईवर विजय मिळवू म्हणजे काय मिळवू, यासाठीच तुम्ही फाटाफूट घडवून आणताय का? मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला आधी कमजोर केले पाहिजे. शिवसेना दुबळी केली पाहिजे. हे फार मोठं कारस्थान आणि षडयंत्र आहे. अशा प्रकारचं भाकीत आम्ही यापूर्वीसुद्धा केलेलं आहे. शिवसेनेत आईचं दूध विकणारी औलाद निर्माण होणार नाही. उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जे सांगितलं ते समजून घ्यायला पाहिजे. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वतःला विकणारे, महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसणारी औलाद ही शिवसेनेत कधी निर्माण होणार नाही, असंही ते म्हणालेत.

जी निर्माण झाली आणि बाहेर पडली, त्यांची अवस्था आपण पाहतोय. ज्यांची नावं मी मीडियात पाहतोय, त्यातील बरेचशे आमदार आता वर्षा बंगल्यावर आहेत. त्यांची नावं चुकीच्या पद्धतीनं घेतली आहेत. गुलाबराव पाटील, संजय राठोड, प्रताप सरनाईक असतील, अशी अनेक नावं मी पाहतोय. जे मंत्री नॉट रिचेबल आहेत, त्यांच्या संपर्क झाल्यावर त्यांनी सांगितलं, आम्हाला काय झालंय ते माहीत नाही, आम्हाला इथे आणलंय. हे आमदार गुजरातमध्ये आहेत. सुरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत, आर सिंह पाटील ते करतायत. त्यांना गुजरातलाच का नेण्यात आलं. सूरतमध्येच का ठेवण्यात आलं. सूरतचे खासदार आर. सी. पाटील आहेत. ते प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत. ते कोणाच्या जवळचे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अशा प्रकारे फसवणूक करून आमदारांना नेलं जातंय, असंही संजय राऊत म्हणालेत.


हेही वाचाः ठाकरे सरकारमध्ये भूकंप; ठाणे, कोकण, मराठवाड्यातील 25 आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमध्ये