प्रयागराज : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. महेश कोठे हे कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. त्यावेळी कुंभमेळ्यात असताना महेश कोठे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Maha Kumbh Mela 2025 Former Solapur Mayor Mahesh Kothe dies due to heart attack)
महेश कोठे हे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वाचे सदस्य होते. वयाच्या 55 व्या वर्षी महेश कोठे यांचे निधन झालं आहे. महेश कोठे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पडल्या आहेत. तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोठे यांचा प्रवास राहिला. महेश कोठे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर अशी ओळख होती. राजकारणातील आणि समाजकारणातील दिग्गज नाव म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र त्यांच्या निधनाने सोलापूरमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, महेश कोठे यांनी 2021 मध्ये शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर महेश कोठे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सोलापूर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे हे विजय देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये यंदाच्या वर्षीचा कुंभमेळा होत आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत कुंभमेळा होत आहे. दर तीन वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री कुंभमेळा भरत असतो. यंदाच्या वेळी हा कुंभमेळा प्रयागराज येथे होत आहे.
हेही वाचा – बाळासाहेबांच्या स्मारक समितीवरून उद्धव ठाकरेंना हटविण्याचा शिंदे गटाचा ठराव, संजय राऊत संतापले