शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवार; अन्य चार जागांचाही उमेदवार ठरला

नाना पटोले म्हणाले, या पाचही ठिकाणी महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील. भाजप हा देशातील नव्हे तर जगातील मोठा पक्ष आहे. पण त्यांना नाशिकमध्ये उमेदवार मिळालेला नाही याचा त्यांनी विचार करायला हवा. भाजपचे घर फोडण्याचे राजकारण आहे. मागून वार करण्याची भाजपची पद्धत आहे. अनिल देशमुख यांच्या अटकेचा जाब आम्ही विधानसभेत भाजपला विचारला.

shubhangi patil

मुंबईः विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व कोकण या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने गुरुवारी उमेदवार जाहिर केले. नागपूर येथे सुधाकर आ़़डबाले, अमरावतीत धीरज लिंगाडे, औरंगाबादमध्ये विक्रम काळे, नाशिक येथून शुभांगी पाटील व कोकण मतदारसंघात बाळाराम पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले म्हणाले, या पाचही ठिकाणी महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील. भाजप हा देशातील नव्हे तर जगातील मोठा पक्ष आहे. पण त्यांना नाशिकमध्ये उमेदवार मिळालेला नाही याचा त्यांनी विचार करायला हवा. भाजपचे घर फोडण्याचे राजकारण आहे. मागून वार करण्याची भाजपची पद्धत आहे. अनिल देशमुख यांच्या अटकेचा जाब आम्ही विधानसभेत भाजपला विचारला. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या लाचेचा आरोप करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई केली, असा सवाल आम्ही भाजपला केला. धमकवण्याचे व दबाव टाकण्याचे भाजपचे तंत्र आहे. मात्र त्याचे उत्तर भाजपला द्यावेच लागेल. पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र आहे. भाजपला त्यांच्या सुडाच्या राजकारणाचे उत्तर द्यावेच लागेल, असा दावा पटोले यांनी केला.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा पाठिंबाच आहे म्हणून तर काँग्रेसशासित राजस्थान, छत्तिसगड व हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू केली आहे परंतु भाजपाशिसत राज्यात ही योजना लागू केली जात नाही. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या मुद्द्यांवरून भाजपाविरोधात तीव्र संताप आहे. महागाई, बेरोजगारी हे मुद्देही महत्वाचे आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवारही मिळाला नाही. भाजपा हा दुसऱ्यांची घरे फोडणारा पक्ष असून पाठीमागून वार करणाऱ्या भाजपाला जनताच धडा शिकवेल, असे पटोले यांनी सांगितले.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नाशिक मतदारसंघातील उमेदवारामुळे अधिकच चर्चेत आली. कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळूनही डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. भाजपनेही महाविकास आघाडीवर टीका केली. शुभांगी पाटील यांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने बैठकीनंतर याबाबत निर्णय जाहिर करु असे सांगितले होते. त्यानुसार महाविकास आघाडीने त्यांचे पाचही उमेदवार जाहिर केले. बाळासाहेब थोरात हे सध्या रुग्णालयात आहेत. त्यांनी काही मत मांडले तर त्याचा विचार केला जाईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

 

शिवसेना, राष्ट्रवादीचाही पाठिंबा

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काही मतभेद नाहीत. आम्ही महाविकास आघाडीचाच भाग आहोत. त्यामुळे या पाचही उमेदवारांना राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच ठाकरे गटाचाही या सर्व उमेदवारांना पाठिंबा आहे. आम्ही सर्वच जण या सर्व उमेदवारांचा प्रचार करणार आहोत. महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी गटाराचे उद्घाटन करावे हे शोभत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन गटाराचे उद्घाटन करावे हे काही शोभत नाही. भाजपने त्यांच्या काळात अनेक आश्वासने दिली होती. त्या आश्वासनांचे काय झाले, याचे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी आधी द्यायला हवे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारला जाणार होता. त्याच्या कामाचे काय झाले, याचे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी द्यायला हवे, असे आवाहन पटोले यांनी केले. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी यावरही पंतप्रधानांना खुलासा करावे लागेल, असेही पटोले यांनी सांगितले.