घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडी ४८ जागा जिंकेल!

महाविकास आघाडी ४८ जागा जिंकेल!

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास, अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते. जनतेने त्यांचा त्रिफळा उडवायचा ठरवला तर महाराष्ट्रात लोकसभेला महाविकास आघाडी ४८ जागा जिंकू शकते, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. जिंकण्याची हिंमत आणि जिद्द ठेवून आपण पुढे जाऊया, असेही ठाकरे म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी यावेळी हिरे यांच्या हातात शिवबंधन बांधले. त्यावेळी आतापर्यंत ज्यांना आम्ही हिरे समजत होतो ते सगळे गद्दार निघाले. बरे झाले गद्दार निघून गेले आणि हिरे आपल्याकडे आले, असे म्हणत ठाकरे यांनी अद्वय हिरे यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले.

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरे यांनी इंडिया टुडे सी व्होटर मूड ऑफ दि नेशनच्या सर्वेक्षणाचा संदर्भ दिला. या सर्वेक्षणात आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किमान ३४ जागा मिळतील, असा निष्कर्ष काढला आहे. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, सर्वेक्षण करणार्‍यांनी किमान हा शब्द घाबरून वापरला आहे. त्यामुळे आपण एकत्र राहिलो तर कमीत कमी लोकसभेच्या ४० जागा महाविकास आघाडीला मिळतील. काही थोड्या जागा त्यांना सोडायला हरकत नाही, पण त्यासुद्धा जनतेने सोडल्या तर. नाहीतर काय सांगावे जनता ४८ जागा आघाडीला देऊ शकते.

यावेळी ठाकरे यांनी अद्वय हिरे यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ घेत भाजपवर जोरदार टीका केली. एखाद्या पक्षावर विरोधी पक्षाने घाला घातला तर तो भाग वेगळा, पण एकेकाळच्या मित्रपक्षाने आमचा पक्ष फोडला. आम्ही २५ ते ३० वर्षे भाजपला भोगले. त्यांना पालखीत बसवून मिरवणुका काढल्या. पालखीत बसवल्यानंतर त्यांचा उदोउदो केला. त्यांना वाटले हे आपल्या पालखीचे कायमचे भोई झाले, पण शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना ही भाजपची नव्हे तर हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली, असे ठाकरे यांनी सुनावले. भाजपने संपूर्ण देशात जो एक अत्यंत घाणेरडा, किळसवाणा पायंडा पाडला आहे तो आपल्याला गाडायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

दादा भुसे यांच्यावर टीका
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्री दादा भुसे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. प्रशांत हिरे यांच्या प्रवेशासाठी मी स्वतः शिवसेनाप्रमुखांसोबत मालेगावला आलो होतो. प्रशांतजी आपल्यासोबत होते, मात्र मधल्या काळात ज्यांनी बिब्बा घातला त्यांना आता आपल्याला लांब ठेवायचे आहे. जे स्वतःच्या स्वार्थासाठी गेले त्या गद्दारांनी माझ्यासमोर अन्नाची शपथ घेऊन सांगितले होते की मी गद्दारी करणार नाही, तरीही ते गेले, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.

मालेगावला सभा घेणार
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी येत्या महिनाभरात मालेगावला येऊन सभा घेण्याचे जाहीर केले. आता जे काही बोलायचे ते मोकळ्या मैदानात बोलू, असे ठाकरे म्हणाले. याचवेळी त्यांनी अद्वय हिरे यांच्यावर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली. तुम्हाला आता मालेगावपुरते काम करून चालणार नाही. तुम्हाला संपूर्ण उत्तर महाराष्ट्र बघावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

५० गद्दारांमुळे आमची गरज संपली! – अद्वय हिरे यांचे भाजपवर टीकास्त्र  

आम्ही असंख्य लोकांना भारतीय जनता पक्षात चांगल्या पदावर बसवले, पण ५० लोक भाजपच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे पक्षाला काय झाले हेच कळत नाही. पक्षाला आता आमची गरज राहिली नाही, अशा शब्दांत अद्वय हिरे यांनी शुक्रवारी भाजपवर टीकास्त्र सोडले.

मी व्यक्तिगत पदासाठी भाजपकडे मागणी केली नव्हती. माझ्या तालुक्यातील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यावेळी जनआंदोलनात मी रस्त्यावर उतरलो. पक्षाकडे न्याय मागितला, पण पक्षाने शेतकर्‍यांना मरू दिले. जो पक्ष शेतकर्‍यांना वाचवू शकत नाही त्याच्या नेतृत्वात मी काम करणार नाही. त्यामुळे मी भाजपचा त्याग केल्याचे हिरे यांनी स्पष्ट केले.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक भाजप पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी बोलताना हिरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. कालपासून भाजपला माझी अचानक आठवण आली. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आले. त्यांना स्पष्टपणे सांगितले की, कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद माझी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करू. येणार्‍या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंना बसविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार अद्वय हिरे यांनी व्यक्त केला.

शिवसेना सोडून लोक निघून जात आहेत हा गैरसमज आहे. जे गद्दार गेले आहेत त्यांना जनता धडा शिकवणार आहे. मी आता भाजपमधून बाहेर पडलोय, पण ४९ मतदारसंघांत भाजपचे नेते थांबले आहेत, ज्यांची कुचंबणा होत आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर ४९ मतदारसंघांतून हे लोक शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा हिरे यांनी केला. २००९ साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची धुळे लोकसभेची जागा निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपबरोबर काम करीत आहे. भाजपमध्ये गेल्यावर सर्वजण पक्ष सोडून गेले होते. देशात सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत तत्कालीन मंत्र्याचा लोकसभा निवडणुकीत पराभव करून भाजपचा उमेदवार निवडून आणला होता. सरपंच, जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आणली होती, अशी माहितीही हिरे यांनी दिली.

अद्वय हिरे विधानसभेत पोहचणार ः संजय राऊत
दरम्यान, अद्वय हिरे यांचा शिवसेनेतला प्रवेश जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो हिरे कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. आतापर्यंत अद्वय हिरे शिवसेनेमुळे विधानसभेत पोहचू शकले नाहीत, परंतु आता शिवसेनेमुळेच ते विधानसभेत पोहचणार आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. शिवसेना पुन्हा महाराष्ट्रावर राज्य करेल याचा अंदाज महाराष्ट्राला येऊ लागला आहे. त्यामुळे शिवसेनेतून कितीही बाजारबुणगे निघून गेले तरीही काहीही फरक पडत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना यावेळी टोला लगावला.

यावेळी संजय राऊत यांनी भाऊसाहेब हिरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात भाऊसाहेबांची महत्त्वाची भूमिका होती. मुंबई महाराष्ट्रासोबत असावी ही जी कठोर भूमिका ज्या प्रमुख नेत्यांनी मांडली त्यातले भाऊसाहेब एक होते. त्यांच्याच कुटुंबातले अद्वय हिरे आज शिवसेनेच्या कुटुंबात आले आहेत. शिवसेना एकसंध आहे आणि आपले नेतृत्व उद्धव ठाकरे करीत आहेत. तुमच्यामुळे शिवसेनेला तरुण नेतृत्व मिळाले आहे. शिवसेना तुम्ही पुढे न्याल असा विश्वास आम्हाला वाटतो, असेही राऊत म्हणाले. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत आदी उपस्थित होते.

दादा भुसे यांना शह
दरम्यान, अद्वय हिरे यांना पक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे मंत्रिमंडळातील मंत्री दादा भुसे यांना राजकीय शह दिल्याचे बोलले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत भुसे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अद्वय हिरे यांना उतरविण्याचे स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -