घरताज्या घडामोडी...आणि तळीयेवासियांनी जड अंतःकरणाने ढिगाऱ्याखाली दबलेल्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्याचा घेतला निर्णय

…आणि तळीयेवासियांनी जड अंतःकरणाने ढिगाऱ्याखाली दबलेल्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्याचा घेतला निर्णय

Subscribe

आपल्या जवळच्या व्यक्तींचे असे छिन्नविछिन्न मृतदेह बघणे क्लेशदायक असल्याने गावकऱ्यांनी ढिगाऱ्याखालीच हे मृतदेह असू द्यावेत. अशी विनंती प्रशासनाला केली आहे.

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला अक्षरश: झोडपून काढलं. यावेळी घरावर दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. रायगड जिल्हयातील महाडच्या तळीये गावावरही निसर्ग कोपला आणि दरडीखाली घर गेल्याने ५३ जणांचा मृत्यू झाला. यातील अनेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर असेही काही मृतदेह आजही चिखल मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत. ज्यांना बाहेर काढणे जवळजवळ अशक्य आहे. कारण चिखल माती आणि पाणी यामुळे हे मृतदेह कुजले आहेत तर काही छिन्नविछिन्न अवस्थेत सापडत आहेत. यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींचे असे छिन्नविछिन्न मृतदेह बघणे क्लेशदायक असल्याने गावकऱ्यांनी ढिगाऱ्याखालीच हे मृतदेह असू द्यावेत. अशी विनंती प्रशासनाला केली असून जिथे ते गाडले गेलेत तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आठवड्याभरापासून रिपरिपणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री मात्र जोर धरला. गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात त्याने थैमान घातलं. जागोजागी पाणी भरलं. घर, बाजारापेठा पाण्याखाली गेल्या. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे डोंगराचे दगड चिखल माती निसरडी झाली. हेच चिखल मातीचे लोळ आणि दगडांची दरड वरंध घाट परिसरातील तळीये गावातील कोंडाळकर वाडीवर कोसळली आणि एका क्षणात ३५ पैकी ३२ घऱे जमिनीत गुडुप झाली. तर दुसरीकडे पूराच्या पाण्याने गावपरिसराला वेढा घेतला. जी कुटुंब यात वाचली त्यांनी मदतीसाठी ढिगाऱ्याकडे धाव घेतली. पण चिखल आणि दलदलीत त्यांचेच गुडघाभर पाय अडकले.

- Advertisement -

मदतीसाठी कोणाला बोलवायचं तेच गावकऱ्यांना कळत नव्हतं. डोळ्यासमोर आपली माणसं घरांसह ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि आपण काहीच करू शकत नाही. ही हतबलता तिथे प्रत्येकाच्या आक्रोशात होती. रडून हंबरडे फोडून माणसं शांत झाली. तर दुसरीकडे पूराच्या पाण्यामुळे एनडीआरएफची मदत पथक जागोजागी अडकली. संपर्क यंत्रणाही ठप्प झाली होती. यामुळे सरकारी मदतीच्या अपेक्षेकडे तळीयेवासी डोळे लावून बसले होते. जसजसा दिवस संपत होता तसतशा ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत असेल या खोट्या आशेवर तळीयेवासी ढिगाऱ्याकडे डोळे लावून बसले होते.

शुक्रवारी सकाळी पाणी ओसरू लागलं. पावसानेही उसंत घेतली. त्यानंतर मदत पथकाच्या कामाला जोर आला. पण तोपर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना १२ तास उलटून गेल्याने कोणी जिवंत असेल याची आशाही मावळली होती. पण तरीही तळीय़ेवासी देवाचा धावा करत होते. अखेर शोधाशोध सुरू झाली. ढिगारे उपसले गेले. पण त्याखाली जे हाती लागत होते ते बघून मदत करणाऱ्यांचेही काळीज हेलावले. कुठे धड सापडलं तर कुठे हात तर कुठे पाय… पण त्याही अवस्थेत  ३६ मृतदेह बाहेर काढण्यात आले. पण आपल्या नातलगांची ही भयंकर अवस्था बघून हंबरडे फोडण्याशिवाय तळीयेवासियांच्या हातात काही राहीले नव्हते. जिवंत माणसांसह घरच जमिनीने पोटात घेतलं होते. यामुळे आहे ती परिस्थिती स्विकारून नातेवाईकांनी मन घट्ट केलं आणि शोधकाम थांबवण्याची विनंतीच प्रशासनाला केली. नातेवाईकांचे छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आहे त्याच ठिकाणी ठेवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -