महानगर Impact : सातव्या मुलीच्या तक्रारीची अखेर दखल, गुन्हा दाखल

पंचवटी : बहुचर्चित ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमाच्याअध्यक्षाने लैंगिक शोषण केल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या सातव्या पीडित मुलीची पोलिसांनी तक्रार न घेता परत घरी जावे लागले होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांची अक्षम्य बेपर्वाई होत असल्यासंदर्भात वृत्त दैनिक आपलं महानगरने बुधवारी (दि.३०) प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने नामुष्की टाळण्यासाठी तातडीने गुन्हा दाखल केला.

ज्ञानदीप आधार आश्रम सोडून गेलेली एक पीडित मुलगी स्वतःहून सोमवारी (दि.२८) दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाण्यात आली. तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांची भेट घेतली असता त्यांनी तिला लैंगिक शोषणप्रकरणात आत्तापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुमचाही गुन्हा नोंदवून घेतला जाईल, त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना भेटा, असे सांगितले. त्यावेळी वरिष्ठांशी संपर्क केला असता गुन्हा नोंदवा सांगितले. मात्र, पीडित मुलीला दिवसभर फिर्याद देण्यासाठी उपाशीपोटी पोलीस ठाण्याच्या आवारात बसावे लागले. पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने तिला निराशेपोटी घरी परतावे लागले. याप्रकरणी आदिम संघर्ष समन्वय समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदन दिले. या संदर्भात दैनिक आपलं महानगरमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पोलिसांनी संशयित आरोपी हर्षल मोरेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास तपासी अधिकारी एसीपी दीपाली खन्ना करत आहेत.