घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Budget Session 2021: मग कशाला हवाय शक्ती कायदा?, फडणवीसांचा ठाकरे...

Maharashtra Assembly Budget Session 2021: मग कशाला हवाय शक्ती कायदा?, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

Subscribe

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. तरीदेखील अजूनही याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला गेला नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session 2021) दुसऱ्या दिवशी बोलले. देवेंद्र फडणवीस यांनी वानवडी पोलिसांवर निशाणा साधला. याप्रकरणातील १२ ऑडिओ क्लिप असूनही पोलिसांचा हातावर हात होता. यापेक्षा जास्त जास्त पुरावे काय पाहिजे? सर्व पुरावे असूनही अजूनही एफआयआर दाखल का केला नाही?, गर्भपात केलेली पूजा राठोड कोण? असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात उपस्थित केले.

‘संजय राठोड यांच्याविषयी बोलताना त्रास होतोय’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘संजय राठोड यांच्याविषयी बोलताना त्रास होतोय. कारण एखाद्याला राजकीय आयुष्य होण्याकरिता जन्म जातो आणि तो उद्धवस्त व्हायला साधा वेळ लागत नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तब्बल २० दिवसात कोणतीच कारवाई नाही? १२ ऑडिओ क्लिप आहेत, तरी यापेक्षा जास्त पुरावे काय पाहिजे कारवाई करण्याकरिता? कोणत्याही प्रकरणात इतके थेट पुरावे कधी सापडत नाही. पण याप्रकरणात सर्व पुरावे असूनही पोलिसांनी साधा एफआयआर दाखल केला नाही. त्यामुळे वानवडी पोलिसांच्या पीआयला निलंबित करावे, अशी मी मागणी करतो. कारण पोलिसांनी इतकी लाचारी कधीच स्वीकारली नव्हती.’

- Advertisement -

‘गर्भपात झालेली पूजा राठोड कोण आहे?’

पुढे फडवणीस म्हणाले की, ‘गूढ प्रकारचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये संशयीत गर्भपात झाल्याचे समोर येते. जे गर्भपात इनलीगल झालेलं, मग ती गर्भपात झालेली पूजा राठोड कोण आहे? कसं तिला रुग्णालयात दाखल करून घेतलं? कोणी दाखल करून घेतलं? ज्याची ड्युटी नाही त्यांनी का दाखल करून घेतलं? ज्याची ड्युटी नाही त्याने का गर्भपात केला? तो नांदेडचा पत्ता का सापडत नाही आहे? कुठलेही कागदपत्र का मागितले नाही? हे सगळे प्रश्न याप्रकरणात उपस्थित होत आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘मेहबूब शेखवर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हणून कारवाई नाही’

‘मेहबूब शेखवर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हणून कारवाई केली जात नाही. ज्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आणि त्यानंतर ती महिला वारंवार म्हणतेय की, याच व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला. पण वास्तव काय याला डीसीपी पाठिंबा देतात. जसं की लग्नात नवरा नवरी नाव घेताना लाजतात तसं डीसीपीला आरोपीचं नाव विचारल्यावर लाजत होता. जणू काही बायकोचं नाव घ्यायचं आहे. ते तर आहेच ना? तुम्ही त्यात बघू घ्याना, असं पत्रकारांना सांगत होते. इतका सरकारचा दबाव?. आमच्याही पक्षात चुकीची लोकं असू शकतात. कोणत्याही पक्षात असे लोकं असू शकता. म्हणून काय तो पक्ष चुकीचा असतो असं नाही. पण आपण जर सत्ता पक्षाला वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाला वेगळा न्याय असं ठरवलं असेल तर कशा हवाय शक्ती कायदा?,’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Assembly Budget Session 2021 : बाराशे रूपयांचे थर्मामीटर ६५०० रूपयांना, जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला – देवेंद्र फडणवीस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -