मुंबई : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही गेले पाच दिवस मख्यमंत्रिपदावरून खल सुरू आहे. आता भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे, नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली असून त्यापैकी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, ’स्वच्छ कारभार’वर फडणवीस यांचा भर असल्याने मागील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Assembly distribution of ministers in Mahayuti and Chief ministership)
हेही वाचा : Mahayuti Govt : महायुतीच्या सत्तेचे सूत्र दिल्लीत ठरणार; अमित शहा यांच्यासोबत गुरुवारी बैठक
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पेच निर्माण झाला. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 132 जागा जिंकल्या. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरल्याने मुख्यमंत्रिपदावर त्याने दावा केला आहे. तर, शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती या निवडणुकीला सामोरे गेली आणि तिने नेत्रदीपक यश मिळवले आहे. त्यामुळे शिंदे यांनाच हे पद पुन्हा मिळावे असा आग्रह शिवसेनेच्या आमदारांचा होता. मात्र, आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या पदावरील दावा सोडल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून, मुख्यमंत्रिपदासाठी जे नाव द्याल, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे सांगितले. परिणामी, भाजपाकडेच हे पद राहणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे जवळपास निश्चित झाले आहे.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फडणवीस हे मंत्रिमंडळ सदस्यांची निवडही चोखंदळपणे करणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिंदे गटातील अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड यांना यावेळी संधी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येते. शिवाय, मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. त्यात भरतशेठ गोगावले आणि संजय शिरसाट यांची नावे आघाडीवर होती. मागील नऊ मंत्र्यांपैकी काहींनी पूर्ण पाच वर्षे तर काहींनी अडीच वर्षे मंत्रिपद उपभोगले आहे, त्यांना पुन्हा संधी देऊ नये. असा सूर पक्षात उमटत आहे. त्यामुळेच यावेळी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक यांना आशा आहे. त्यामुळे, नव्या मंत्रिमंडळात जुन्यांना वगळून नव्यांना संधी दिली जाईल, तसेच महिलांचेही प्रमाण लक्षणीय असेल, अशी शक्यता आहे.