छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. शहरातील तीन मतदारसंघातमध्ये काही ठिकाणी हाणामारी, बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी आणि उमेदवारांकडून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना धमकावण्याची घटना घडली. तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की देखील झाली. शहरामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी आज केला आहे.
इम्तियाज जलील हे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार आहेत. भाजपचे विद्यमान आमदार अतुल सावे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मदारसंघात पैसे वाटप केले गेल्याचा आरोप जलील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मुस्लि बहुल भागात मतदानाच्या एक दिवसआधीच यांनी गरीब, मुस्लिम महिलांना एक-एक हजार रुपये देऊन त्यांच्या बोटाला शाई लावून दिल्याचा गंभीर आरोप जलील यांनी केला. यावेळी त्यांनी काही व्हिडिओ देखील दाखवले.
जवाहर नगर पोलिस स्टेशन समोर भाजप पदाधिकारी अॅड. अरविंद डोणगावकर यांचे ऑफिस आहे. तिथे मुस्लिम महिलांना रिक्षात भरुन आणण्यात आले आणि अॅड. अरविंद डोणगावकर यांच्या कार्यालयात महिलांना एक-एक हजार रुपये देऊन तिथे त्यांच्या बोटांना शाई लावण्यात आली. ज्या महिला अधिक पैशांची मागणी करत होत्या त्यांना दोन-दोन हजार रुपये दिले गेले. असेही जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अॅड. अरविंद डोणगावकर यांच्या कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे. तसेच जवाहर नगर पोलिस स्टेशन समोरच त्यांचे कार्यालय आहे, त्यामुळे पोलिस स्टेशनचेही सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी मागणी जलील यांनी केली आहे.
अतुल सावेंचे कार्यकर्ते पैसे वाटतानाचा व्हिडिओ देखील जलील यांनी ट्विट केला. आंबेडकरनगरमध्ये पैशांसाठी महिलांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. तिथे शेकडो महिला पैसे वाटाणाऱ्या कार्यकर्त्याभोवती गर्दी करताना दिसून आल्या.
A @BJP4India leader who came to distribute money at Ambedkar Nagar, a slum area in Aurangabad was surrounded by women for their 500 rupee note.! And all this as advance to cast their vote in favour of BJP minister Mr Atul Save. And these are visuals from just one area. What more… pic.twitter.com/hFfqL7lBUj
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) November 20, 2024
माजी खासदार आणि औरंगाबाद पूर्वचे उमेदवार इम्तिया जलील यांनी हे सर्व व्हिडिओ पुरावे महाराष्ट्रा निवडणूक आयोगाला पाठवले असल्याचे सांगितले.
Edited by – Unmesh Khandale