Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाElection 2024 : दीड हजार रुपये मतदान कार्ड जमा, मतदानापूर्वीच मतदारांच्या बोटाला...

Election 2024 : दीड हजार रुपये मतदान कार्ड जमा, मतदानापूर्वीच मतदारांच्या बोटाला शाई; कोण करत आहे ही ‘कारवाई’

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – मतदान करण्यासाठी पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर शहरात व्हायरल होत आहे. त्यासोबतच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत आहेत. ही बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी जवळपास 18 लाखांची रक्कम जप्त केली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा फोन आल्यानंतर पोलिसांनी 2 कोटी रुपयांची रक्कम सोडून दिली असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

शहरात पैसे वाटण्याचे व्हिडिओ समोर आलेले असताना पोलीस यंत्रणा सर्रास याकडे दुर्लक्ष करत आहे. मतदारांना पैसे वाटण्याचे सत्ताधारी आमदारांचे काम पोलीस यंत्रणेच्या वरदहस्तानेच सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मतदान केंद्रातील शाई एक दिवस आधीच बाहेर कशी येते? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या ‘कर्तव्यदक्ष’पणावरही बोट ठेवले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी यावर खुलासा करावा आणि तातडीने कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

- Advertisement -

मतदारांच्या बोटाला मतदानापूर्वीच शाई

जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब व अशिक्षित मतदारांना दलालामार्फत मतदान व आधार कार्ड आणि बोटाला शाई लावण्याचे काम करत आहे. मुस्लिम मतदारांनी मतदान करू नये, त्याच्या मोबदल्यात तुटपुंजी रक्कम दिले जात असल्याचे गंभीर प्रकार सुरू असल्याचा बाब यावेळी दानवे यांनी लक्षात आणून दिली.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जवाहर नगर येथे दीड हजार रुपये, मतदान कार्ड आणि आधार कार्ड जप्त करून कारवाई केल्याचे भासवले जात असल्याचा आरोप दानवेंनी केला आहे. मतदान बुथ वरील शाई मतदानापूर्वी बाहेर येते कशी? असा सवाल दानवेंनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले की, हे प्रकरण चार दिवसांपूर्वी उघडकीस येऊन सुद्धा पोलीस तातडीने कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाने हे प्रकरण पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पोलीस यंत्रणा सत्ताधारी आमदारांना मदत करते की काय अशी शंका घेण्यास वाव असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. ते म्हणाले, आठवडाभरापूर्वी निवडणूक आयोगाला या प्रकरणी पत्र लिहिले होते. मात्र या प्रकरणी कारवाईचा दिखावा करण्यात आला.

संभाजीनगरात पैसे वाटण्याचे काम पोलिसांच्या देखरेखी खालीच सुरु आहे. पोलीस यंत्रणेची अशी भूमिका असेल तर निःपक्षपाती निवडणुका कशी होईल? असा सवाल उपस्थित करत पोलीस यंत्रणा निष्पक्ष आहे का ? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.

संभाजीनगरात घडलेल्या या प्रकरणीची पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त शहरातील एका सत्ताधारी आमदाराला मदत होईल अशाप्रकारे काम करत असल्याचे गंभीर आरोप दानवे यांनी केले. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना जुने गुन्हे बाहेर काढून तडीपारच्या नोटिसा दिल्या जात आहे. पोलीस यंत्रणा स्पष्टपणे पक्षपातीपणा करत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना जलद गतीने कारवाई होत नसल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा : PM Modi : पंतप्रधान विमानात चढताना मला प्रत्येक पायरीवर एक-एक मृतदेह दिसत होता; मोदींच्या दौऱ्यावर दानवेंची टीका

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -