छत्रपती संभाजीनगर – विधानसभा निवडणूक 2024 करीता जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया काही अपवाद वगळता शांततेत व सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात सकाळी शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटच्या गाडीवर हल्ला झाला. यात सिद्धांत यांना कोणतीही इजा झाली नाही. दुसरीकडे उस्मानपुरा भागात संजय शिरसाट ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धमकावतानाचा व्हिडिओ समोर आला. वाळूजमध्ये एका मतदारकेंद्रावर पोलिसांनी लाठीचार्जही केला.
मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी
सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.
सिल्लोड- 70.46 टक्के,
कन्नड- 62.02 टक्के,
फुलंब्री- – 61.49 टक्के,
औरंगाबाद मध्य- 53.98 टक्के,
औरंगाबाद पश्चिम- 52.68 टक्के,
औरंगाबाद पूर्व- 55.76 टक्के,
पैठण- 68.52 टक्के,
गंगापूर- 68.52 टक्के,
वैजापूर- 64.21 टक्के.
असे एकूण सरासरी 60.83 टक्के मतदान झाले होते. सायं.5 ते 6 वा. पर्यंतच्या म्हणजेच मतदान संपेपर्यंतची आकडेवारी अद्याप प्राप्त व्हायची आहे.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ बिहारप्रमाणे भासत होता – अंबादास दानवे
जिल्ह्यात सर्वाधिक मतदान सिल्लोड मतदारसंघात झाले. तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात दिवसभर गोंधळ आणि राडा पाहायला मिळाला. विद्यमान आमदार संजय शिरसाट यांचे धमकावतानाचे व्हिडिओ देखाल समोर आले. नारेगाव भागात दोन गट समोरासमोर आले. तिथे पोलिसांना लाठामार करावा लागला. तर वाळूज भागात दिवस संपता संपता औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ बिहारप्रमाणे भासत होता. वाळूजच्या अल्फोन्सो शाळेच्या मतदान केंद्रावर पोलिसांनी मतदारांवर अकारण लाठीमार केल्याची घटना समोर आली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेच आज विविध ठिकाणी घडणाऱ्या घटनांचे व्हिडिओ ट्विट करत होते.
हेही वाचा : Election 2024 : बीड जिल्हाधिकारी धनंजय मुंडेंच्या शेतातला गडी; घाटनांदूरमध्ये मतदान केंद्राची तोडफोड
Edited by – Unmesh Khandale