मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध या निवडणुकीत टोकाला गेल्याचे दिसत आहे.राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबईतील माहिम मतदारसंघातून ते निवडणूक लढत आहेत. येथे महायुतीने मनसे उमेदवार अमित ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे, अशी मनसे नेत्यांची इच्छा होती. महायुतीकडूनही तसे प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते, मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. अमित ठाकरेंना शिंदेंनी पाठिंबा दिला नाही, त्यामुळेच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील संबंध बिघडल्याचे म्हटले जाते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरला असल्याची टीका राज ठाकरे करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंकडून का टीका होत आहे, यावर भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज ठाकरे यांनी काय बोलायचे, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी काय बोलायचे, काय ठेवायचे, हे ते ठरवतील. त्यांच्याशी माझी नेहमीच समन्वयाची भूमिका राहिली आहे. ते माझ्याकडे कामे घेऊन यायचे, मी त्यांना मदत करायचो. पण आता निवडणूक असल्यामुळे माणूस भाषणात बोलतो, त्यावर मी फार विचार करत नाही. माझा त्यांच्याशी काही वादविवाद नाही.” असे ते म्हणाले.
दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ह गट, दोन्ही पवार एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्याप्रमाणे शिवसेनेचे दोन्ही गट, अर्थात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येणार का, यावर एकनाथ शिंदे म्हणाले, की, “आम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा मानतो. त्यांची विचारधारा आता वेगळी आहे. त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. हे बाळासाहेब ठाकरे यांना कधीही पसंत पडले नसते. मात्र त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे. त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि आमचा मार्ग वेगळा आहे. असे सांगत दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Amit Thackeray Reveals : अमित ठाकरेंनी सांगितले विधानसभा निवडणूक लढवण्याचे कारण; म्हणाले…
Edited by – Unmesh Khandale