मुंबई – भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागले आहे. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून पडळकर विजयी झाले आहेत. आधी ते विधान परिषद सदस्य होते. पडळकर विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांवर टीका करताना ते म्हणाले की “आता त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घ्यायला हवी.”
निकालानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे कराडमध्ये पोहचले होते. येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी छोटी राज्य विरोधकांकडे आणि मोठी राज्यात भाजप जिंकत असल्याचे सांगत ईव्हीएमवर टीका केली होती. पवारांच्या या टीकेवर पडळकर म्हणाले, “शरद पवारांनी आता स्वेच्छा निवृत्ती घेण्याची गरज आहे. खरंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती. लोकसभेत जिंकल्यानंतर त्यांनी महायुतीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. मात्र आता विधानसभेत तुम्हालाच जागा दाखवली,” असा टोला पडळकरांनी पवारांना लगावला.
शरद पवार नावाचा अध्याय संपला…
विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार पडळकर म्हणाले, कोलांट्या उड्या मारणारा हा माणूस आहे. आता विषय संपला आहे. शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे संपलेला आहे, असंही पडळकर म्हणाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीही अशाच पद्धतीची टीका शरद पवारांवर केली होती. शरद पवारांचा एरा संपला असं फडणवीस म्हणाले होते. आता पडळकर यांनी तशाच पद्धतीची टीका केली आहे. ते ‘टीव्ही 9’ मराठीसोबत बोलत होते.
पडळकर सांगलीतून विजयी
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपने सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. गोपीचंद पडळकर यांनी 38 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांचा त्यांनी पराभव केला. पडळकर आता विधान परिषदेचा राजीनामा देऊन विधानसभेत दिसणार आहेत. धनगर समाजाचे नेते म्हणून पडळकर ओळखले जातात.
Edited by – Unmesh Khandale