मुंबई – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण, असा प्रश्न सामान्य मतदारांना पडला आहे. हा पेच आणखी वाढवण्याचे काम पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांकडून झाले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) शिवेसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिल्याचे पत्र व्हायरल होत आहे. मात्र अजित पवार गटाने हे पत्र बनावट असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेला पाठिंब्याच्या पत्रावर अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची खोटी सही असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
सिंदखेड राजा मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रावादीने दावा केला. यामुळे महायुतीच्या जागा वाटपात या मतदारसंघावर तोडगा निघाला नाही. महायुतीच्या दोन्ही प्रमुख पक्षांनी येथे अधिकृत एबी फॉर्म वाटप करुन उमेदवार दिले आहेत. शिंदे गटाने शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने मनोज कायंदे यांच्या हाती घड्याळ दिली आहे. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी शिंदे गटाचे नेते येऊन गेले, तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही खेडेकरांच्या प्रचाराला हजेरी लावली. यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पक्ष सध्या मतदारसंघात व्हायरल होत आहे. त्यावर अजित पवार गटाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांची स्वाक्षरी आहे. त्यांच्या सहीनीशी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. मात्र अजित पवार गटाने हे बनावट पत्र असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार गटाच्या आमदाराची घरवापसी
सिंदखेडराजा मतदारसंघातील अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी ऐन निवडणुकीच्या आधी शरद पवार गटात प्रवेश केला. तुतारी हाती घेऊन शिंगणे सिंदखेडराजा मतदारसंघाच्या मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे महायुतीमध्ये अधिकृत उमेदवार कोण यावरुनच वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मतदारसंघ आहे, येथे अजित पवारांनी मनोज कायंदे यांच्या हाती घड्याळ दिले आहे. तर शिवसेना शिंदे गटाने सिंदखेडराजामध्ये शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे.
Edited by – Unmesh Khandale