Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाVidhan Sabha Result 2024 : मराठवाड्याचे महायुतीच्या पारड्यात भरभरुन मतांचे दान; काँग्रेस-राष्ट्रवादीला...

Vidhan Sabha Result 2024 : मराठवाड्याचे महायुतीच्या पारड्यात भरभरुन मतांचे दान; काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितचा फटका

Subscribe

मुंबई – महायुतीला छप्पर फाड यश 15व्या विधानसभेत मिळाले आहे. महायुतीच्या यशामध्ये मराठवाड्याचा वाटा मोलाचा आहे. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 39 जागांवर भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर एका जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाने विजय मिळवला आहे.

मराठवाड्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणामुळे महायुतीला फटका बसणार, असे भाकित वर्तवले जाते होते. मात्र महाराष्ट्रातील इतर महसुली विभागांप्रमाणेच मराठवाड्यानेही महायुतीच्या झोळीत भरभरुन दान टाकले. जरांगे फॅक्टर कुठे जाणवलेला नाही. मराठवाड्यातील ओबीसी हे आधीपासून भाजपसोबत होतेच, आता मराठा समाजही भाजपसोबत आला आहे, तो आधीही भाजपसोबतच होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

मराठवाड्यात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीनच्या दराचा मुद्दा ऐन निवडणुकीत ऐरणीवर आला होता. साडे तीन ते चार हजार रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांची मागणी  आहे की किमान सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी सोयाबीनची खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी महायुतीला भोवणार, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालाने सर्व अंदाज फेल ठरवले आहे.

सहा महिन्यांपूर्वी मराठवाड्यात सात खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले. तोच टेम्पो कायम राहिल आणि किमान 36 जागा आघाडीच्या येतील असा अंदाज वर्तवला जात होता. या उलट भाजप 19, शिवसेना 12, आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे गुट्टे विजयी झाले आहेत. असे 40 आमदार महायुतीचे विजयी झाले आहेत. तर बालेकिल्ल्यातून ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 जागा मिळाल्या आहेत. निष्ठावान उदयसिंह राजपूत यांचा पराभव शिवसेना शिंदेच्या उमेदवार संजना जाधव यांनी केला. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपमधून आलेले सुरेश बनकर यांनी टफ फाईट दिली. सत्तार यांना 1 लाख 37 हजार 960 मते मिळाली तर सुरेश बनकर यांना 1 लाख 35 हजार 540 मते मिळाली. 2420 मतांनी ठाकरेंच्या उमेदवाराचा येथे पराभव झाला. शिंदेंसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा निवडून आले आहेत. मात्र ठाकरेंच्या उमेदवारांविरोधात त्यांची घासून लढत झाली.

- Advertisement -

वंचिताच राजेश टोपेंना फटका 

मराठवाडा हा शरद पवारांच्या संकटकाळात कायम त्यांच्यासोबत राहतो, असे म्हटले जाते. लोकसभेत हे वाक्य सत्यात उतरलेले दिसले. मात्र विधानसभेत मराठवाड्याने थोरल्या पवारांची साथ सोडली. कोरोना काळात आरोग्य मंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याचे राजेश टोपे यांच्याबद्दल बोलले गेले, त्यांचा घनसावंगीत पराभव झाला. त्यांचा पराभव 2309 मतांनी झाला. या मतदारसंघात वंचितच्या कावेरी खटके यांना 20731 मते मिळाली.

देशमुखांची सद्दी संपली?

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी अमित देशमुखांनी काँटे की टक्कर देत भाजप उमेदवाराविरोधात विजय मिळवला तर, लातूर ग्रामीण मधून त्यांचे धाकटे बंधू धीरज देशमुख यांचा पराभव झाला.

अतुल सावेंना निसटता विजय 

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे औरंगाबाद पूर्वमधून पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. मात्र शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर पडले आणि अवघ्या 2116 मतांनी त्यांचा भाजपचे अतुल सावेंनी पराभव केला. या मतदारसंघात वंचितचे अफसर खान यांना 6507 तर समाजवादीचे गफ्फार कादरी यांना 5943 मते मिळाली. मराठवाड्याने भरभरुन मतांचे दान महायुतीच्या पारड्यात टाकले आहे.

मराठवाडा – 46 जागा
भाजप – 19
शिवसेना – 12
राष्ट्रवादी – 08
काँग्रेस – 01
शिवसेना ठाकरे – 03
राष्ट्रवादी SP – 02
अपक्ष – 01

हेही वाचा : Maharashtra Assembly Election 2024 Result : छोटे पक्ष, अपक्षांचा सुपडा साफ; महायुतीच्या महापुरात सगळे गेले वाहून

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -