मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. महाविकास आघाडीचा सपशेल पराभव करत महायुतीला मोठा विजय झाला आहे. शिवसेनेच्या दोन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या नंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यासोबतच अनेक छोटे पक्ष स्वतंत्रपणे या निवडणुकील्या सामोरे गेले होते. यामुळे राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल आणि महायुती किंवा महाविकास आघाडी यांना बहुमत मिळणार नाही. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यानेच 2024 विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करावे लागेल असे अनेक निवडणूक विश्लेषकांना वाटत होते. मात्र महाराष्ट्राच्या जनतेने एक्झिट पोलसह सर्वांचे अंदाज फोल ठरवत महायुतीला विक्रमी बहुमत दिले आणि दुसरीकडे अपक्ष आणि छोट्या पक्षांचा डब्बा गूल केला आहे. बच्चू कडू यांनी आमच्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा केला होता. मात्र बच्चू कडू यांचाच आता पराभव झाला आहे.
मनसेसाठी ‘अनाकलनीय’ निकाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 136 हून अधिक जागा लढवल्या होत्या. त्यासोबतच त्यांनी 12 जागांवर महायुतीला पाठिंबा दिला होता. निकालानंतर महायुती विजयी होणार आणि मनसे सत्तेत सहभागी होणार असा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. मात्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनाही ते विजयी करु शकलेले नाही. अमित ठाकरे हे प्रथमच विधानसभा निवडणूक लढवत होते. तर दुसरीकडे त्यांचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना भाजपने पाठिंबा दिला होता, त्यांचाही शिवडीत पराभव झाला आहे. मनसेने 2019 मध्ये मोदी नको म्हणून प्रचार केला होता. तर 2024 लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींना पतंप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांची प्रत्येक निवडणुकीत बदलणारी भूमिका, याचाच फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसल्याचे मानले जात आहे. आजच्या निकालावर राज ठाकरे यांनी ‘अनाकलनीय’ अशी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
बहुजन विकास आघाडीचा सुपडा साफ
बहुजन विकास आघाडीने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचा सुपडा साफ झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा वसईमध्ये 3275 मतांनी पराभव झाला आहे. त्यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर यांचा तब्बल 37 हजार मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात निवडणुकीच्या आधी हाय होल्टेज ड्रामा झाला होता. विनोद तावडे पाच कोटी रुपये वाटण्यासाठी मतदारसंघात आले असल्याचा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला होता. वसई आणि नालासोपारा येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. बहुजन विकास आघाडीचे सहा पैकी एक उमेदवाराने निवडणुकीच्या दिवशी भाजपला पाठिंबा दिला होता, उर्वरीत पाच उमेदवारांचा पराभव झाला.
वंचित विधानसबेतही ‘वंचित’
राज्यात सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष म्हणून वंचितकडे पाहिले जात होते. 200 जागा वंचित बहुजन आघाडीने लढवल्या. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला यंदा एकही जागा आली नाही. अकोला जिल्ह्यातील किमान तीन जागा येतील असा अंदाज होता, मात्र त्यांचाही सुपडा साफ झाला. जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ, असे एक दिवसापूर्वीच वंचितने समाजमाध्यमावर म्हटले होते. मात्र जनतेने लोकसभेनंतर पुन्हा एकदा विधानसभेत त्यांना सपशेल नाकारले आहे.
समाजवादी आणि एमआयएमला यश
समाजवादी पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यांना दोन जागांवर यश मिळाले आहे. भिवंडीमध्ये रईस शेख आघाडीवर आहेत, तर पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबू आझमी यांचा मानखुर्द- शिवाजीनगरमध्ये विजय मिळाला आहे. एमआयएमला पुन्हा एकदा दोन जागा येताना दिसत आहेत. मात्र यंदाही त्यांना पूर्वीच्या जागा राखता आल्या नाही. सोलापूरमधून शाब्दी विजयी झाले तर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाय जलील यांची भाजपसोबत काँटे की टक्कर सुरु आहे. तिथला निकाल अजून आलेला नाही.
परिवर्तन महाशक्ती झाली अशक्त
महाराष्ट्रात तिसरी आघाडी किंगमेकर ठरणार असा दावा करत जवळपास 70 जागा बच्चू कडू, संभाजी महाराज छत्रपती आणि राजू शेट्टी यांनी लढवल्या. स्वतः बच्चू कडू यांचा अचलपूरमध्ये पराभव झाला. त्यामुळे किंग आणि किंगमेकर या संकल्पना हवेत विरल्या आहे. महायुतीच्या महापुरात छोटे पक्ष अक्षरशः वाहून गेले आहेत.
शेतकरी, स्वाभिमानी, राष्ट्रीय समाज पक्ष एका-एका जागेवर…
शेतकरी कामगार पक्षाला महायुतीत सन्मानजनक जागा मिळाल्या नाही, असे सांगत त्यांनी स्वतःचे चार उमेदवार उभे केले. त्यापैकी फक्त सांगोला येथे त्यांना विजय मिळत असल्याचे दिसत आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीवर आरोप करत अनेक उमेदवार उभे केले होते. त्यांचाही फक्त एकच आमदार विजयी होताना दिसत आहे.
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांचा बडनेरा येथून विजय झाला. लोकसभेत राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. त्या भाजपच्या उमेदवार होत्या.
Edited by – Unmesh Khandale