कर्जत (रायगड) : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भर उन्हात कर्जतमध्ये जंगी सभा झाली. कार्यकर्ते, समर्थक, सभेला जमलेले लोक उन्हात असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही उन्हात उभे राहून भाषण केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर आणि त्यांच्या उमेदवारावर जोरदार निशाणा साधला. गुवाहाटीत टेबलावर नाचणाऱ्यांना आता परत गुवाहाटीला पाठवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कर्जतकरांना केले.
महाराष्ट्र भाजपने राज्याला नाही तर पीएम केअर फंडाला दिले पैसे
भारतीय जनता पक्षाने आज विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरुन उद्धव ठाकरे बरसले. ते म्हणाले की, भाजपला एकच प्रश्न विचारतो जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाविरोधात लढत होता, तेव्हा भाजपच्या महाराष्ट्र युनिटने महाराष्ट्राला पैसे न देता पीएम केअर फंडला पैसे दिले होते. हे तुमचे महाराष्ट्राबद्दलचे प्रेम आहे का? भाजपने केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले की, भाजपने पश्चिम महाराष्ट्रात अशा एकाला उमेदवारी दिली आहे, जयकुमार गोरे त्यांचा आमदार आहे. त्याने मृत व्यक्तीला जिवंत दाखवून त्याचे पैसे लाटले. यावरून हायकोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले आहेत. हा भाजपचा उमेदवार आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“गद्दाराला गाडायचे, कोणत्याही परिस्थितीत गाडायचे”
कर्जतमधील नितीन सावंत, पनवेलच्या उमेदवार लीना गरड यांचा उल्लेख करुन उद्धव ठाकरे म्हणाले की तुमच्या हाकेला ओ देणारे हे उमेदवार आहेत. मी आज मुद्दामहून इथे आलो कारण गद्दाराला गाडायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत गाडायचे आहे. ज्या दिवशी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ‘वर्षा’हून ‘मातोश्री’कडे निघालो त्या दिवशी हा गद्दार हातात दारूचा ग्लास घेऊन टेबलावर नाचत होता. गद्दारी सेलिब्रेट करणारा हा कर्जतकरांचा आमदार होऊ शकतो का? असा सवाल करुन उद्धव ठाकरे म्हणाले, एक तर गद्दार, त्यावर चोरीचा मामला. आमचं सरकार आल्यावर याला खडी फोडायला पाठवतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना दिला.
रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पाच उमेदवार आहे. त्यामध्ये कर्जत-खालापूर मतदारसंघातून नितीन सावंत, पनवेल मतदारसंघात लीना गरड, उरण मतदारसंघातून मनोहर भोईर, प्रसाद भोईर हे पेण मतदारसंघातून तर महाड-पोलादपूरमधून स्नेहल जगताप यांना उमेदवारी दिली आहे. येथे काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काम करत असल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख महेंद्र घरत यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे आभार मानले. आम्ही देखील विदर्भात काँग्रेस उमेदवारांसाठी असाच प्रचार करत असल्याचे ते म्हणाले.
केलंय काम भारी, होर्डिंगवरुन निशाणा
महायुतीने केलंय काम भारी असे होर्डिंग लावले आहेत. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, होर्डिंग लागले आहेत. केलंय काम भारी… लुटली तिजोरी… केली गद्दारी… पुढे लाचारी.. यांना आता गुवाहाटीला पाठवून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
हेही वाचा… Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी जयंत पाटलांना काय सुनावलं, रायगडमधील राजकारणाला नवा ट्विस्ट ?
जयंतराव विचित्र कारभार करु नका…
महाविकास आघाडीसोबत असलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यावर मात्र उद्धव ठाकरे बरसले. जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाने पनवेल, उरण आणि पेणमध्ये बंडखोरी केली आहे. त्यावरुन ठाकरे म्हणाले की, जयंतराव विचित्र कारभार करु नका. अलिबागमध्ये मी माणूसकी दाखवली, तुमच्या कुटुंबासाठी जागा सोडली. मात्र तुम्ही उरण, पेण, पनवले, सांगोला इथे उमेदवार दिले. त्यांनी ते मागे घेतले नाही. लढायचे तर उघड लढा, मैत्री करायची तर मोकळ्या मनाने करा, असा इशारा वजा विनंती उद्धव ठाकरेंनी मित्र पक्षाला केली.
हेही वाचा : Raigad Politics : ठाकरे गटाकडून शेकापवर अखेरचा वार, ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात नक्की चाललंय काय
(Edited by Unmesh Khandale)