मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी अविश्वसनीय ठरलेल्या या निकालाने शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला मिळून 50 जागाही दिलेल्या नाही. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेताही निवडता येऊ नये एवढा मानहानीकारक पराभव या तिन्ही पक्षांचा झाला आहे. महायुतीला विक्रमी बहुमत मिळाले आहे. एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या तर त्यांच्यासोबतच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 57 आणि 41 जागा मिळाल्या आहेत.
विधानसभा निकाला लागून आज सहा दिवस होत आहेत, मात्र महाविकास आघाडीचे नेते या धक्क्यातून सावरलेले नाही. निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणांना या पराभवासाठी जबाबदार धरण्यात येत आहे, त्यांच्यावर टीका केली जात आहे. काँग्रेसचे मुंबई प्रदेशचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना मर्यादा ओलांडली आहे. निवडणूक आयोग हा श्वानाचे काम करत असल्याचा गंभीर आरोप भाई जगताप यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भाई जगताप आयोगाला काय म्हणाले..
भाई जगताप हे मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. विधान परिषदेवर आमदार असलेल्या भाई जगताप यांनी निकालावर भाष्य करताना म्हटले की, इतकी मोठी आपली लोकशाही आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे जर लोकशाहीवर काही प्रश्न उपस्थित केले जात असतील, काही शंका असतील तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाला आणि सरकारला द्यावंच लागेल. निवडणूक आयोग श्वान आहे. जेवढ्या केंद्रीय संस्था आहेत त्या सर्व संस्था श्वान होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसल्या आहेत. ज्या संस्था आपल्या लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्याच असा व्यवहार करत आहेत.’ अशी जहरी टीका त्यांनी केली.
भाई जगताप यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय संस्थांना मोदींच्या दारातील श्वान म्हटले आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बोलणे हे वाचाळविरांसारखे आहे. त्यामुळे तेच भूंकताना दिसत आहेत. त्यांची दृष्टी जशी आहे, त्यांना तसेच दिसणार असा टोला दरेकरांनी जगतापांना लगावला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनीही निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिले आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे, अशी मागणी केली आहे. पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा फुलेंच्या भिडे वाडा येथे आत्मक्लेष आंदोलन सुरु केले आहे.
हेही वाचा : EVM : ईव्हीएम शिवाय निवडणुका घ्या, भाजपची ताकद कळेल; MIMचे इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप
Edited by – Unmesh Khandale