मुंबई : राज्यात बुधवारी सर्वच्या सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. यंदाही मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नसला तरी 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी दिलासादायक असल्याचे दिसते आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 3.67% जास्त मतदान झाले आहे. यासोबतच गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 27.7 टक्क्यांनी जास्त असे एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (maharashtra assembly election district wise voting 2024 vs 2019)
महाराष्ट्रात बुधवारी विधानसभेसाठी मतदान झाले. राज्यातील सर्वच 36 जिल्ह्यांसाठी हे मतदान झाले. यात काही जिल्ह्यांमध्ये चांगले मतदान झाले. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 65.11 टक्के मतदान झाले आहे. तर 2019 मध्ये राज्यात एकूण 61.44 टक्के एवढे मतदान झाले. 2019 च्या तुलनेत राज्यात यंदा 3.67 टक्के जास्त मतदान झाले आहे.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : लोकल सुरूच… कोणताही व्यत्यय न आणता रेल्वे कर्मचाऱ्यांचे मतदान
या निवडणुकीत राज्यातील 9.70 कोटींहून अधिक मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करण्यास पात्र होते. यात 5 कोटी पुरूष आणि 4.69 कोटी महिला तर 6,101 मतदार हे तृतीयपंथी होते. बुधवारी मतदान संपले तेव्हा या निवडणुकीत उतरलेल्या 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
या निवडणुकीतही सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात (76.25%) झाले आहे. तर मुंबई शहरात (52.07%) अत्यंत कमी मतदान झाले आहे. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगले मतदान झाले आहे. विशेष म्हणजे, मुंबई शहर, उपनगर, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरात मतदानाला फटका बसल्याचे दिसते आहे, आणि येथे कमी मतदान झाले. यासोबतच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मतदानाचा टक्का 2019 च्या तुलनेत घसरला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने रात्री साडेअकरा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 65.02 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, शेवटच्या तासाभरात मतदानाचा टक्का वाढला. 2019 प्रमाणे यावेळीही कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झाले.
त्या तुलनेत मुंबई आणि उपनगराची कामगिरी निराशाजनक राहिली. मुंबई शहरातील 10 मतदारसंघ मिळून 52.07 टक्के तर, मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांमध्ये 55.77 टक्के मतदान झाले. मात्र, 2019च्या तुलनेत यावेळी येथील मतदानात चांगलीच घट झाली आहे. मुंबई उपनगरात 62.19 तर मुंबई शहरात 62.18 टक्के एवढे मतदान झाले होते.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : राज्यात सुमारे 65.02 टक्के मतदान, यावेळीही कोल्हापूरची बाजी
बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के, 11 वाजता 18.14 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, 3 वाजता 45.53 आणि सायंकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदान नोंदवले गेले होते. त्यामुळे यावेळी 2019 प्रमाणे 62 टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, मतदारांनी शेवटच्या टप्प्यात दाखवलेल्या उत्साहामुळे मतदानाची टक्केवारी 65 टक्क्यांच्या पुढे गेली.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar