छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीला पुन्हा सत्तेचा सोपान चढण्याची संधी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे 132, शिवसेना शिंदे गट 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यात विरोधीपक्ष नेता निवडीचा अधिकारही जनतेने ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला दिला नाही. तिसरी आघाडी किंगमेकर ठरेल असे म्हटले जात होते, मात्र बच्चू कडूंपासून मनसे, वंचित, बहुजन विकास आघाडी यांना भोपळाही फोडता आला नाही. महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. मराठावड्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसेल असे म्हटले जात होते. या विभागानेही महायुतीला भक्कम साथ देत 40 जागा दिल्या. महाविकास आघाडीला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मराठा कार्ड चालले नाही, संविधान बचाव मुद्दा त्यांच्या कामाला आलेला नाही.
जरांगे फॅक्टरचे काय झाले?
मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाची मोठी धग होती. गेली 13-14 महिने मनोज जरांगे हे जालना येथे आंदोलन करत आहेत. लोकसभेत शरद पवारांनी मराठा उमेदवार दिले आणि ते बहुतेक निवडून आले. यंदाही त्यांनी तोच प्रयोग केला. तर महायुतीनेही मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली. मराठवाड्यातून निम्म्याहून अधिक मराठा समाजाचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मराठा समाज नेमका कोणासोबत राहिला, मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत तेवढा परिणामकारक राहिलेला नाही का, अशी चर्चा निकालानंतर सुरु झाली आहे. त्यासोबतच मनोज जरांगे फॅक्टरही या निकालाने निकाली काढला आहे का, अशीही चर्चा आहे. मात्र मनोज जरांगे यांनी आता सामूहिक उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी मी कुठेही दौरा केला नाही, मराठा समाजाने महायुतीला पाठिंबा दिला. त्याची आता लाज राखा असे त्यांनी आज निकालानंतर म्हटले आहे. त्यामुळे मनोज जरांगे हे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात मराठा समाजाचे किती आमदार?
मराठावाड्यातील 46 जागांपैकी 29 जागांवर मराठा समाजाचे आमदार निवडून आले आहेत. महायुतीचे मराठा कार्ड मराठवाड्यात चालेले दिसत आहे. महायुतीचे सर्वाधिक 25 मराठा समाजाचे उमेदवार विजयी झाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असा संदेश दिला होता, त्यांच्या आवाहनला मराठवाड्यातील मराठा समाजाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. महाविकास आघाडीचे चार मराठा समाजाचे उमेदवार विजयी झाले आहे. तर ओबीसी समाजाचे 8 आमदार आहेत त्यातील सात महायुतीचे आहेत.
हेही वाचा : Mahayuti : ऐतिहासिक विजयानंतर पुढे काय? महायुती 2.0 मुख्यमंत्री पद, खात्यांसाठी दिल्ली वाऱ्या, मुंबईत खलबतं!
Edited by – Unmesh Khandale