मुंबई : राज्याच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर नेहमीप्रमाणे ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीनुसार, जेवढे मतदान झाले त्यापेक्षाही जास्त मते मतमोजणीदरम्यान समोर आली आहेत. मतदानाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता ही तफावत समोर आली आहे. (maharashtra assembly election result 2024 additional votes maharashtra data mismatch between votes polled and counted)
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 66.05 टक्के एवढे मतदान झाले. यात 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला, 3 कोटी 34 लाख 37 हजार 057 पुरूष आणि 1820 अन्य मतदारांसह एकूण 6 कोटी 4 लाख 88 हजार 195 मतदारांनी मतदान केले. मात्र, मोजली गेलेली एकूण मते ही 6 कोटी 45 लाख 92 हजार 508 एवढी आहेत. म्हणजेच, जेवढे मतदान झाले आहे त्यापेक्षा 5 लाख 4 हजार 313 एवढी अतिरिक्त मते आहेत. या संदर्भात ‘द वायर’ या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : EVM वर शंका नाही पण…; आव्हाडांनी पोस्ट केली चक्रावणारी आकडेवारी
एकूण जेवढे मतदान झाले, त्यापेक्षा कमी मते मतमोजणीतून समोर आल्याचे राज्यातील आठ मतदारसंघात दिसले आहे. तर उर्वरित 280 मतदारसंघात हीच परिस्थिती उलटी आहे. तिथे जेवढे मतदान झाले त्यापेक्षा मतमोजणीतून समोर आलेली मते जास्त आहेत. यात सर्वाधिक तफावत ही आष्टी आणि उस्मानाबाद मतदारसंघात दिसते. जिथे मतदानापेक्षा मतमोजणीत अनुक्रमे 4 हजार 538 आणि 4 हजार 155 वाढीव मते समोर आली आहेत. दरम्यान, या संदर्भात ‘द वायर’ या संकेतस्थळाने निवडणूक आयोगाकडून माहिती मागवली आहे. मात्र, अद्याप ती उपलब्ध झालेली नाही.
मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील मतदानाची आकडेवारी आणि फॉर्म 17C या मुद्द्यांच्या आधारे चर्चा झाली होती. फॉर्म 17C हा प्रत्येक मतदान केंद्रावरील मतांची नोंद ठेवतो. लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक मतदान टप्प्यांतर्गत 48 तासांच्या आतील मतदान केंद्र निहाय मतदानाचा डेटा जाहीर करण्यासाठी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. कारण, सुरुवातीच्या आणि अंतिम मतदानाच्या आकडेवारीमध्ये जवळपास 5-6% ची तफावत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, अशाप्रकारे आकडेवारी प्रसिद्ध केल्याने त्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाने केला, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. तसेच फॉर्म 17C हा केवळ उमेदवारांच्या एजंटना दिला जातो, तो सार्वजनिक वापरासाठी नसतो, असेही निवडणूक आयोगाने म्हटले होते.
लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेतही अशाप्रकारे मताच्या आकड्यात गोंधळ होणे, हे माहितीत पारदर्शकता नसल्याचे तसेच निवडणूक प्रक्रिया चोख नसल्याचे निदर्शक आहे. अशा विसंगतींमधील सातत्य हे डेटा संकलन तसेच त्याची सत्यासत्यता तपासण्याच्या पद्धतींबद्दल प्रश्न निर्माण करतो. फॉर्म 17C मधील माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसल्याने एकूण मतांची संख्या आणि लोकांच्या प्रश्नांना देणे हे अधिक आव्हानात्मक बनते. अशा विसंगतीचा निवडणूक निकालावर परिणामही होत असतो. जिथे कॉंटे की टक्कर असते, अशा ठिकाणी हे जास्त प्रमाणात जाणवते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अशाप्रकारे मतदान आणि मतमोजणीतील शेकडा किंवा काही हजाराच्या मतांचा फरक हा निवडणूक निकालासाठी परिणामकारक ठरू शकतो, तसेच वारंवार समोर येणाऱ्या अशा घटना या यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचेही ते सांगतात.
नवापूर या राखीव मतदार संघाचा विचार केला असता, तिथे मतदानापेक्षा मतमोजणीत जास्त मते समोर आली आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, येथील एकूण मतदार आहेत 2 लाख 95 हजार 786, आणि त्या दिवशी मतदानाची टक्केवारी होती 81.15 टक्के. म्हणजेच, 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 2 लाख 40 हजार 22 लोकांनी मतदान केले. मात्र, निकालाच्या दिवशी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण 2 लाख 41 हजार 193 मते मोजण्यात आली. म्हणजेच 1 हजार 171 मते येथे जास्त मोजली गेली. आणि येथील विजयी उमेदवाराचे मताधिक्य आहे अवघे 1 हजार 122 मते.
जिथे मतदार जास्त आणि मतमोजणीत कमी मते समोर आली आहेत अशा मावळ मतदारसंघाची आकडेवारी पाहू. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, येथील एकूण मतदार आहेत 3 लाख 86 हजार 172, आणि मतदानाची टक्केवारी होती 72.59 टक्के. म्हणजेच 2 लाख 80 हजार 319 मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने निकालादिवशी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण मतमोजणी झाली 2 लाख 79 हजार 081 मतांची. म्हणजेच मतदानापेक्षा मतमोजणीत 1 हजार 238 मते कमी झाल्याचे समोर आले.
कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुका, डेटा एन्ट्री इश्यू किंवा ईव्हीएम हाताळताना होणारे तांत्रिक बिघाड, व्हीव्हीपॅट स्लिपमधील चुका अशा गोष्टींमुळे ही तफावत होत असते. यामुळेच यंत्रणेतील पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे.
मोजलेली मते एकूण मतांपेक्षा जास्त नाहीत – राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेले प्रत्यक्ष मतदान आणि मोजणी केलेल्या मतांची आकडेवारी जुळत नसल्याचा तसेच 5,04,313 अतिरिक्त मते असल्याचा द वायरने प्रकाशित केलेला अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचा खुलासा राज्य निवडणूक आयोगाने केला आहे. अचूक तपशील न घेता घाईघाईने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 288 मतदारसंघांमध्ये ईव्हीएममध्ये मतदान झालेल्या 6,40,88,195 मतांमध्ये वैध 5,38,225 पोस्टल मतपत्रिका जोडल्यावर एकूण मते 6,46,26,420 एवढी होतात. त्यामुळे मोजलेली मते ही एकूण मतांपेक्षा जास्त नाहीत, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar