मुंबई – दिवाळी संपली आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप – प्रत्यारोपांचे फटाके फुटायला सुरुवात झाली. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार संपला आहे. आता प्रतीक्षा आहे 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची. आता पुढील 36 तास निवडणूक आयोगाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. मतदानाची प्रक्रिया चोखपणे पार पाडल्यानंतर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होणार का हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रात प्रथम ऐतिहासिक म्हणता येईल अशी निवडणूक होत आहे. सहा प्रमुख पक्षांमध्ये लढत होत आहे. त्यातील दोन पक्ष फुटून त्यांचा प्रत्येकी एक गट सत्ताधाऱ्यांसोबत आहे, तर दुसरा विरोधात आहे. यामुळे ही निवडणूक वेगळी आहे. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष्य महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे.
सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठलेपर्यंत अनेक नेते प्रचार करत होते. तर भाजपशासित राज्यातील आमदार आणि खासदारही महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात तळ ठोकून आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली, तर पंतप्रधान मोदींनी एक है तो सेफ है, अशी हिंग्लिश घोषणा महाराष्ट्राच्या प्रचारात आणली.
महाविकास आघाडीकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा गाजवल्या. महायुतीने लोकसभा निवडणुकीनंतर आणलेल्या लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. दरमहा तीन हजार रुपये महिला भगिणींना देण्याची गॅरंटी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी दिली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी, सोयाबीनला सात हजार रुपये भाव ही घोषणा उद्धव ठाकरेंनी दिली आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले, राज्यातील पाच लाख तरुणांचे रोजगार यामुळे बुडाले हा विरोधकांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता.
बुधवारी मतदान होणार आहे, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाक्-युद्ध आज शांत झाले. आता छुपा आणि ‘अर्थ’पूर्ण प्रचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. लोकसभेवेळी मुंबईत झालेली मतदारांची गैरसोय यावेळी टाळण्याचे प्रयत्न आयोगाकडून केले जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष मतदानादिवशी काय होते, ते आता पाहावे लागेल.
हेही वाचा : NCP Vs NCP : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळेंच्या साडी अन् बांगड्यांची चर्चा; काय आहे कारण
Edited by – Unmesh Khandale